Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते यांना अटकेपासून दिलासा; पुणे पोलीस रिकाम्या हाताने माघारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 05:31 PM2022-04-26T17:31:04+5:302022-04-26T17:52:18+5:30
मुंबईत शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हे दाखल होण्यास सुरूवात झाली
पुणे: मुंबईत शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हे दाखल होण्यास सुरूवात झाली. पुण्यात छत्रपती संभाजी राजे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी एका व्यक्तीने तक्रार दिली होती. त्यानुसार सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोल्हापूर पोलिसानंतर आता गुणरत्न सदावर्ते यांना आता पुणे पोलीस ताब्यात घेणार होते. परंतु न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची अटकपूर्व जामिनावर सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांना रिकाम्या हाताने माघारी यावे लागणार आहे.
सदावर्ते सध्या कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात होते. तेथील त्यांची पोलीस कोठडी काल संपली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले गेले. न्यायालयाच्या आदेशाने त्यांची अटकपूर्व जामिनावर सुटका करण्यात आली. पुणे पोलिसांना सदावर्ते यांचा ताबा न घेता माघारी यावे लागणार आहे.
पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाने दिली होती तक्रार
भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज परिसरात राहणारे अमर रामचंद्र पवार (वय ३५ वर्षे) यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार दिली होती. अमर पवार हे बांधकाम व्यावसायिक असून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून काम पाहतात. सदावर्ते यांनी ७ ऑक्टोबर २०२० रोजी एका वृत्तवाहिनीवर बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ही तक्रार देण्यात आली होती.
अटकेपासून दिलासा
मराठा आंदोलनावेळी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत मुंबई पोलिसानंतर सातारा पोलिसांनी गुणरत्न सादावर्ते यांचा ताबा घेतला. त्यानंतर साताऱ्यातल्या कोर्टानेही काही दिवस त्यांची कोठडीत रवानगी केली. मात्र तोपर्यंत अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. साताऱ्यात थोड्या अडचणी कमी होताच गुणरत्न सदावर्ते यांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. काही दिवस त्यांचा मुक्काम कोठडीत राहिला. आणि कोल्हापुरात थोड्या अडचणी कमी झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा पुणे पोलीस घेणार होते. मात्र त्यांना आता अटकेपासून दिलासा मिळाला आहे.