Pune Crime: गोळ्या झाडून खून, गुंडांवर मोक्का; आता कोठडीचीच खा हवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 11:40 AM2023-11-25T11:40:16+5:302023-11-25T11:41:33+5:30
लोधा आणि साथीदारांनी गेल्या महिन्यात परप्रांतीय मजुरावर पिस्तुलातून गोळीबार करुन त्याचा खून केला होता....
पुणे : घोरपडे पेठेत दहशत माजवून परप्रांतीय कामगारावर गोळ्या झाडून खून केला. या प्रकरणी टोळीप्रमुख नवनाथ लोधासह साथीदारांविरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (माेक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.
नवनाथ ऊर्फ नब्बा सुरेश लोधा (वय ३७, घोरपडे पेठ), गणेश उल्हासराव शिंदे (वय ४२, रा. चव्हाणनगर, धनकवडी), रोहित संपत कोमकर (वय ३३, रा. गुरुवार पेठ), अमन दीपक परदेशी (वय २९, रा. घोरपडे पेठ) अशी या गुंडांची नावे आहेत.
लोधा आणि साथीदारांनी गेल्या महिन्यात परप्रांतीय मजुरावर पिस्तुलातून गोळीबार करुन त्याचा खून केला होता. लोधा आणि साथीदारांविरुद्ध यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे लोधासह साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव खडक ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक सुनील माने, गुन्हे शाखेचे निरीक्षक संपतराव राऊत, सहायक निरीक्षक राकेश जाधव, उपनिरीक्षक अतुल बनकर आदींनी तयार केला. संबंधित प्रस्तावास अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्याकडे पडताळणीसाठी पाठविला. पोलिस आयुक्तांनी या प्रस्तावास मंजुरी देऊन मोक्का कारवाईचे आदेश दिले. रितेश कुमार यांनी पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शहरातील ८९ गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे.