संतांच्या दिंड्या आळंदीकडे रवाना; गुरु हैबतबाबांच्या पायरीपूजनाने होणार सोहळ्यास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 02:56 PM2021-11-26T14:56:29+5:302021-11-26T15:02:45+5:30
संत ज्ञानेश्वर महाराजांचा यंदा ७२५ वा संजीवन समाधिदिन सोहळा आहे...
आळंदी: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीदिन सोहळ्यासाठी अलंकापुरीत आलेल्या सर्व वारकऱ्यांचे दर्शन सुकर पध्दतीने व्हावे म्हणून इंद्रायणी काठच्या प्रशस्त जागेत तात्पुरती दर्शनबारी उभारण्यात आली आहे. तत्पूर्वी शनिवारी (दि.२७) सकाळी आठला महाद्वारातील गुरु हैबतबाबांच्या पायरीपूजनाने सोहळ्यास सुरुवात होणार असून मुख्य पहाटपूजा मंगळवारी (दि.३०) तर माऊलींचा संजीवन सोहळा २ डिसेंबरला पार पडणार आहे. दरम्यान सर्व अलंकापुरी या दिमाखदार सोहळ्यासाठी सज्ज झाली असून नगरपालिका, देवस्थान, पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांचा यंदा ७२५ वा संजीवन समाधिदिन सोहळा आहे. दरम्यान मागील दोन वर्षे कोरोनामुळे कार्तिकी वारी रद्द केल्याने यंदाच्या वारीची आस वारकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे 'श्री'च्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल होतील अशी शक्यता आहे. मात्र कोरोनाच्या भीतीने वारकरी कसा प्रतिसाद देतात ते महत्त्वाचे आहे. यापार्श्वभूमीवर इंद्रायणी नदीपलीकडच्या जागेत दर्शनबारी उभारण्यात आली आहे. याशिवाय मंदिरालगत दोन मजली दर्शनबारी असून त्याठिकाणीही भाविकांची दर्शनाला जाण्याची सोय आहे. घातपाताची शक्यता आणि चेंगराचेंगरीसारखी घटना होवू नये यासाठी देवूळवाड्यात दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सिसीटीव्ही कॅमेरे, धातुशोधक यंत्रणा तपासणारी यंत्रणा बसविण्यात आली आहे.
माऊलींच्या मुख दर्शनानंतर पान दरवाज्यातून भाविकांना बाहेर पडण्याचा मार्ग बनविण्यात आला आहे. याचबरोबर हनुमान दरवाजा आणि गणेश दरवाजा बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांना मंदिरात येताना पिशव्या, चपला आणण्यास मज्जाव घालण्यात आला असून तोंडाला मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. संशयास्पद वस्तूंची तपासणी करण्यासाठी धातुशोधक यंत्रणा मंदिरात बसविली जाणार आहे. याशिवाय देवस्थानचे सुरक्षा रक्षक आणि आळंदी पोलिसांच्यावतीने महाद्वार, पानदरवाजा, दर्शनबारी, पंखा मंडप, वीणामंडप, हनुमान दरवाजा, गणेश दरवाजा, इंद्रायणी घाट, भक्ती सोपान पूल याठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. शिवाय महिला पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त आहे.