गुरूनाथ नाईक यांना पहिली रहस्यकथा पुण्यातच सुचली, जुन्या आठवणींना उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 07:47 PM2021-11-03T19:47:24+5:302021-11-03T19:47:31+5:30
गूढ शैली आणि रंजकता या वैशिष्टांमुळे त्यांच्या कादंब-यांनी मराठी वाचकांना अक्षरश: खिळवून ठेवले
पुणे : आपल्या रहस्यकथांनी अवघ्या महाराष्ट्राला झपाटून टाकणारे आणि तब्बल बाराशे कादंब-या लिहून रहस्यकथेच्या प्रांतात अढळ स्थान निर्माण करणारे "रहस्यकथा"कार गुरूनाथ विष्णू नाईक (वय 84) यांचे बुधवारी पुण्यात निधन झाले.
गुरूनाथ नाईक यांना पहिली रहस्यकथा ही पुण्यातच सुचली. १९७० साली कामानिमित्त पुण्यात आले असताना एका प्रकाशकाने त्यांना दोन रहस्यकथा लिहून देण्याची विनंती केली आणि क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी होकार दिला. यादरम्यान ते पुण्यातील अलका चित्रपटगृहात 'किस द गर्ल्स अँन्ड मेक देम डाय' हा इंग्रजी चित्रपट पहायला गेले. डोक्यात कथा लिहून देण्याचे विचार सुरू होते. अचानक चित्रपट अर्धवट सोडून ते उठले आणि थेट रूमवर
गेले. रात्री दोन वाजेपर्यंत जागून त्यांनी ‘मृत्यूकडे नेणारे चुंबन' ही पहिली रहस्यकथा लिहून काढली.
त्यानंतर ‘शास्त्रज्ञाच्या मृत्यूचे गूढ’ ही दुसरी कथा त्यांनी लिहिली. प्रकाशकाकडून त्यांच्या कथा लेखनाला हिरवा कंदिल मिळाला आणि गुरुनाथ नाईक यांचा रहस्य कथाप्रांतात उदय झाला. १९७० ते १९८२ या काळात त्यांनी ७२४ रहस्य व गूढकथा लिहिल्या. यात सैनिकी जीवनावरील २५० शिलेदार कादंब-या आहेत. गोलंदाज ही काल्पनिक व्यक्तिरेखा साकारून त्याच्या भोवती १५० कथा लिहिल्या. त्यांच्या कादंब-यांनी अल्पावधीतच लोकप्रियता मिळविली. पुणे आकाशवाणी केंद्रासाठी त्यांनी काही सांगीतिका आणि श्रृतिकाही लिहिल्या.
गूढ शैली आणि रंजकता या वैशिष्टांमुळे त्यांच्या कादंब-यांनी मराठी वाचकांना अक्षरश: खिळवून ठेवले. आपल्या घराण्याचे ’नाईक’ हे मूळ आडनाव वापरून तसेच ‘हेमचंद्र साखळकर’ हे नाव परिधान करून त्यांनी विपुल लेखन केले. ’कॅप्टन दीपच्या ’’शिलेदार’ कथा, मेजर अविनाश भोसलेच्या ‘गरुड’ कथा, उदयसिंह राठोडच्या, ‘गोलंदाज’कथा, सूरजच्या ‘शब्दवेधी’ कथा, रजनी काटकरच्या ‘रातराणी’ कथा, जीवन सावरकरच्या ‘सागर’ कथा आणि बहिर्जी नाईकच्या ‘बहिर्जी’ कथा, अशा एकाहून एक सरस पात्रांच्या सुरस आणि मनोवेधक रहस्यकथा लिहून त्यांनी साहित्य विश्वात स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. बाबूराव अर्नाळकरांच्या कादंब-यांचाही विक्रम नाईक यांनी मोडला.
नाईक यांची ‘अजिंक्य योद्धा’, ’अंधा कानून’, ’अंधाराचा बळी’, ’अफलातून’, ’आसुरी, ‘कायदा’, ‘कैदी नं. १००’, ’गरुडभरारी’, ’गोलंदाज’, ’झुंज एक वा-याशी’, ‘तिसरा डोळा’, ’दिल्लीचा ठग’, ’देहान्त’, ’रणकंदन’, ‘रणझुंज’, ‘सरळ चालणारा खेकडा’, ’सवाई’, सुरक्षा’, ‘हर हर महादेव’ अशी अनेक पुस्तके लोकप्रिय ठरली आहेत. ’स्वर्ग आणि नर्क’ ही त्यांची शेवटची कादंबरी ठरली.