गुटखा, सुगंधित सुपारीवरील बंदी वाढविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 09:12 PM2018-07-21T21:12:21+5:302018-07-21T21:20:37+5:30
गुटखा, सुगंधित तंबाखू आणि सुपारीवरील बंदीची मुदत आणखी एक वर्षाने वाढविण्याचा निर्णय अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) घेतला आहे.
पुणे : गुटखा, सुगंधित तंबाखू आणि सुपारीवरील बंदीची मुदत आणखी एक वर्षाने वाढविण्याचा निर्णय अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) घेतला आहे. या निर्णयात वाहतुकीवर देखील बंदी घातल्याने बंदी घातलेल्या पदार्थांची वाहतुक करणाऱ्यांना देखील जरब बसणार आहे.
राज्य सरकारने २०१२ साली राज्यात गुटखाबंदी लागू केली. त्याच्या पुढच्याच वर्षी (२०१३) सुगंधित आणि स्वादिष्ट सुपारीवर देखील बंदीचा सरकारने निर्णय घेतला. एफडीएच्या अधिकारात दरवर्षी या पदार्थांवरील बंदीचा कालावधी वर्षभराने वाढविण्यात येत आहे. या बंदीचा कालावधी संपल्याने शुक्रवारी (दि. २०) बंदी कालावधी वाढविल्याचा अध्यादेश सरकारने काढला. त्यामुळे गुटखा, पानमसाला, स्वादिष्ट-सुगंधित तंबाखू, मिश्रणयुक्त तंबाखू, खर्रा, मावा अशा एकत्र अथवा वेगवेगळ्या पुडीत अथवा कोणत्याही स्वरुपात विकण्यास प्रतिबंध घातला आहे. या पदार्थांची निर्मिती, साठवण, वितरण, विक्री आणि वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. पुर्वीच्या आदेशात वाहतुकीवरील बंदीचा समावेश नव्हता. परिणामी अनेकदा न्यायालयीन प्रक्रियेत अडचणी उद्भवत होत्या. त्यामुळे वाहतुकीवर देखील बंदी घालण्यात आली आहे. अवैधरित्या प्रतिबंधित वस्तूंची वाहतुक करणाºयांवर अधिक वचक बसेल.
गुटखा, पानमसाला, तंबाखू आणि सुपारीमुळे हायपर मॅग्नेशिया, हृदयरोग, तोंडाचा कर्करोग, ल्युक्योप्ल्याकिया, अन्न नलिकेचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, प्रजनस्वास्थ, जठर, आतडे व श्वसनाचे आजार होतात. एफडीएमार्फत ११५३ नमुन्यांची चाचणी केली असता, त्यात घातक अशा मॅग्नेशियम काबोर्नेटचे घटक आढळून आले होते. टाटा रुग्णालयासह विविध संस्थांनी देखील गुटखा, पानमसाला आणि सुपारीच्या घातकतेवर शिक्कामोर्तब केले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गुटखा, तंबाखू आणि सुगंधित सुपारीवर बंदी घातली होती.
ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हे आॅफ इंडिया यांनी २००९-२०१०मध्ये केलेल्या सर्वेक्षणात ३५ टक्के व्यक्ती कोणत्याना कोणत्या प्रकारे तंबाखू सेवन करीत असल्याचे आढळून आले होते. राष्ट्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेच्या अहवालात १६ कोटीपेक्षा अधिक लोक धूम्रविरहीत तंबाखूचा वापर करतात, असे अध्यादेशात म्हटले आहे.
----------------
गुटख्याचा जप्त साठा रुपयांत
साल रुपये (कोटींमध्ये)
२०१२-१३ २०.४७
२०१३-१४ १५.६६
२०१४-१५ १७.५३
२०१५-१६ २४.३७
२०१६-१७६ २२.९८
२०१७-१८ ३९.८४
२०१८-१९
जुलैपर्यंत १४१.१३
-----------------------