शिक्रापूरला ४३ लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:08 AM2021-07-10T04:08:39+5:302021-07-10T04:08:39+5:30
लोकतम न्यूज नेटवर्क शिक्रापूर : अवैधरीत्या गुटखा वाहतूक करणाऱ्या तीन गाड्यांसह सुमारे ४३ लाख रुपयांचा गुटखा तर ...
लोकतम न्यूज नेटवर्क
शिक्रापूर : अवैधरीत्या गुटखा वाहतूक करणाऱ्या तीन गाड्यांसह सुमारे ४३ लाख रुपयांचा गुटखा तर ३५ लाख रुपयांची वाहने असा ७८ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी शिक्रापूर येथून ताब्यात घेतला. या प्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. ८) रात्री करण्यात आली. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे.
पोलीस हवालदार सचिन मोरे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. तर लखन अश्रूबा लोंढे (वय २७, रा. साईपार्क बिल्डिंग, मोशी, ता. हवेली), सुरेश कसाब (वय २१, हल्ली चिंबळी फाटा, नाशिक रोड, चाकण), कृष्णा बालाजी बिंडे (वय २१, मूळ रा.बोरवंड ब्रु ता. गंगाखेड, जि. परभणी), अंकित शिवमोहन सिंग (रा. चाकण, ता. खेड), बापू गवते (पूर्ण नाव व पत्ता समजू शकला नाही), अंकुर सुनील गुप्ता (रा. मेदनकरवाडी, खंडोबा मंदिराजवळ, चाकण, ता. खेड), विरेंद्र बुध्दसेन गुप्ता (रा. करंजाडे, रायगड), महेश जसराज भाटी (रा. शिवकल्याणनगर कोथरूड पुणे), नरेश देवासी (पूर्ण नाव माहीत नाही), ओमजी (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) तसेच तिन्ही वाहनांचे मालक आणि शोएब रोड लाईन्स पॅकर्स अँण्ड मुव्हर्सचे मालक यांच्याविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री पुणे नगर मार्गावरून तीन गाड्यांमध्ये गुटखा विक्रीसाठी नेण्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या पथकाने पुणे नगर मार्गावर सापळा लावला. या वेळी संशयित तीन ट्रक शिक्रापूर येथे थांबविण्यात आले. त्यांची तपासणी केली असता त्यात राज्यात बंदी असलेला विमल गुटखा आढळला. या कारवाईत सुमारे वीस लाख किमतीच्या एका कंटेनरमध्ये गोण्यांमध्ये सुमारे २० लाख रूपये किमतीचा व्ही वन तंबाखू पॅकिंगचे पुडे, विमल पानमसाल्याचे पुडे आढळले. एका बलेरो मोटारीत सुमारे १९ लाख २३ हजार रुपयाचा गुटखा गोणीमध्ये भरला असल्याचे सापडले. व्ही वन तंबाखूच्या १०४० पॅकिंग पुडे व ३६ गोण्यांमधे विमल पानमसाल्याच्या पुडे भरले होते. तर एका टेम्पोमध्ये सुमारे ४ लाख ७० हजार रुपये किमतीचा गुटखा व तंबाखू गोण्यांमध्ये आढळला. या तिन्ही वाहनांमध्ये शोएब रोड लाईन्स पॅकर्स अॅण्ड मुव्हर्सचे बिलटी कागदपत्रे. तसेच महेश जसराज भाटी, अंकुर सुनिल गुप्ता, विरेंद्र बुध्दसेन गुप्ता यांचे आधारकार्ड झेरॉक्स जोडलेले पॅकिंग लिस्ट आढळले. या कारवाईत जवळपास ४३ लाखांचा गुटखा तर २० लाखांचा कंटेनर, १० लाखांची मोटार आणि ५ लाखांचा टेम्पो असा एकूण ७८ लाख ३२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे व शिक्रापूर पोलिसांनी केली.