भोर तालुक्यात गुटखाबंदीचा फार्स
By admin | Published: January 10, 2017 02:29 AM2017-01-10T02:29:10+5:302017-01-10T02:29:10+5:30
राज्य शासनाने गुटखाविक्रीवर बंदी घातलेली असतानाही भोर शहरात व ग्रामीण भागातील टपऱ्या तसेच दुकानात सर्रासपणे जादा
भोर : राज्य शासनाने गुटखाविक्रीवर बंदी घातलेली असतानाही भोर शहरात व ग्रामीण भागातील टपऱ्या तसेच दुकानात सर्रासपणे जादा भावाने गुटखाविक्री सुरू आहे. याकडे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गुटखाबंदीचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे.
नागरिकांच्या आरोग्याला धोका होऊ नये म्हणून शासनाने गुटखाबंदीचा निर्णय घेतला. यामुळे शासनाचा सुमारे १०० कोटींचा महसूल बुडणार आहे. तरीही हा निर्णय घेतला. मात्र शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी काही दिवसच चालली. त्यानंतर पुन्हा गुटखा विक्री सुरू झाली आहे.
भोर शहरातील टपऱ्यांवर
आणि ग्रामीण भागातील दुकानातून १२ रुपये किमतीचा गुटखा २० ते ५० रुपयांपर्यंत जादा पैसे घेऊन
विकला जात आहे. गुटखा खाणारे शौकिन जादा पैसे देऊन गुटखा घेत आहेत.
याचाच गैरफायदा घेत चोरून गुटखाविक्री करणारे आपले उखळ पांढरे करीत आहेत. शासनाचा गुटखाविक्रीचा निर्णय चांगला आहे. मात्र, बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)