गुटखा विक्री नियमांची होतेय सर्रास पायमल्ली

By admin | Published: May 3, 2017 02:21 AM2017-05-03T02:21:00+5:302017-05-03T02:21:00+5:30

महाराष्ट्रात गुटखाविक्री बंदीचा नियम शासनाने लागू केला असला, तरी रावेत, आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर, वाल्हेकरवाडी परिसरासह शहरात

The gutkha sale rules are very common | गुटखा विक्री नियमांची होतेय सर्रास पायमल्ली

गुटखा विक्री नियमांची होतेय सर्रास पायमल्ली

Next

 रावेत : महाराष्ट्रात गुटखाविक्री बंदीचा नियम शासनाने लागू केला असला, तरी रावेत, आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर, वाल्हेकरवाडी परिसरासह शहरात सर्वत्र खुलेपणाने गुटखाविक्री सुरू आहे. ठरावीक लोकांना हप्ते द्या आणि दुकाने, पानाच्या टप-या वा अन्य कोठेही बिनधास्तपणे गुटखाविक्री करा, असा अलिखित फतवाच हप्तेखोरांनी काढला असल्याची परिस्थिती आहे.
कर्करोगासारख्या घातक रोगांचे मूळ असलेली तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन करू नका असे, आवाहन शासनाच्या आरोग्य विभागाकडून दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून सातत्याने केले जात आहे. महाराष्ट्रात गुटखा, तसेच पानमसाल्याचे उत्पादन, वितरण, साठा व विक्री करण्यास अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ नुसार बंदी घालण्यात आली असून, गुटखाविक्री करणा-यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तरीही उपनगरात सर्वत्र खुलेआम चढ्या भावाने गुटखा विक्री सुरू आहे. रावेत आणि परिसरात तर गुटखा विक्रीचा घाऊक बाजार झाला आहे.
रावेत, आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, गुरुद्वारा चौक परिसरात किराणा मालाची दुकाने आणि पान टपऱ्यांवर सर्रास गुटखाविक्री सुरू आहे. विविध पोलीस ठाण्यांचे कलेक्टर समजले जाणारे काही पोलीस कर्मचारी या दुकानदारांना धमकावत त्यांच्याकडून मासिक हप्ते घेत खुलेआम गुटखा विक्रीसाठी अलिखित परवानगी देत असल्याचे अनेक व्यावसायिकांनी सांगितले. स्टेशन परिसरात टप-यांकडून जादा रक्कम आकारली जात आहे.
एकूणच शहरासह उपनगरात सर्वत्र खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडूनही गुटखा विक्रीवर कारवाई होत नसल्याचे सांगितले जात आहे. या भागात विक्रीवर कोणाचेच नियंत्रण नसल्यासारखी परिस्थिती दिसत आहे. या गुटखा विक्रीमागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे.
मात्र जेथे कुंपणच शेत खात आहे, तेथे कारवाई करायची कोणावर व करणार कोण हे प्रश्न उपस्थित होत असून, कारवाई करणा-यांच्या खिशातच गुटख्याच्या पुड्या असल्याची परिस्थिती आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या गुटखाविक्री बंदीची सर्रास पायमल्ली होत असून, पैशासाठी नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे वास्तव पाहायला मिळत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी, तसेच अन्न व औषध प्रशासनाने कडक पावले उचलत हप्तेखोरांवर, तसेच सर्रासपणे गुटखा विक्री करणा-यांवर कारवाई करणे आवश्यक आहे.(वार्ताहर)

विक्रेते व व्यापारी मोकाट
गुटख्याची चोरटी विक्री करणारे विक्रेते व त्यांना माल उपलब्ध करून देणारे व्यापारी मोकाट सुटले आहेत. दुकानातून अथवा पानपट्टीतून खुलेआम गुटखा विक्री केली जात नसली, तरी नेहमीच्या ग्राहकाला त्रयस्थ ठिकाणी पाठवून किंवा बोलावून चोरून विक्री केली जाते. नवख्या ग्राहकाला संबंधित विक्रेते गुटखा मिळत नसल्याचे सांगतानाच नेहमीच्या ग्राहकांना मात्र हवा तेवढा गुटखा पुरविला जाताना दिसतो. गुटख्याच्या पुड्यांची विक्री मूळ दराच्या तिप्पट ते चौपट दराने केली जात आहे.
ठोस व कडक कारवाईची गरज
राज्यात गुटखा बंदी सुरूच ठेवण्याचा शासनाचा विचार स्तुत्य असला, तरी अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागासह पोलीस खात्यानेही गुटखा मिळणा-या ठिकाणांचा कसून शोध घेऊन त्यांना पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक व ठोस कारवाई करावी. असे केल्यानेच ख-या अर्थाने गुटखाबंदी होईल, असे मत सर्वसामान्य नागरिक, गृहिणी, सामाजिक, तसेच व्यसनविरोधी संघटनांनी व्यक्त केले.

बंदीतही बिनधास्त विक्री
गुटखाबंदीच्या कालावधीत एखाद्या किरकोळ विक्रेत्याच्या दुकानावर धाड टाकून अन्न व औषध प्रशासन विभाग, तसेच पोलीस कारवाईचा फार्स करताना दिसून येत आहेत. कारण गेल्या वर्षभरात परिसरात कोठेही गुटख्याचा साठा सापडला नाही की विक्री करणारे सापडले नाहीत. तरीसुद्धा बाजारात मोठ्या प्रमाणावर गुटखा उपलब्ध होऊन त्यांची बिनधास्त विक्री कशी होते आहे, हा संशोधनाचा भाग झाला आहे.

Web Title: The gutkha sale rules are very common

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.