पोखरलेल्या यंत्रणेमुळे राजरोसपणे गुटख्याची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:10 AM2021-01-18T04:10:15+5:302021-01-18T04:10:15+5:30

धायरी : महाराष्ट्रात गुटखाबंदी केली असली तरी गुटखाबंदी झाल्यानंतर सुरुवातीला काही काळ गुटखा उत्पादक धास्तावले होते. मात्र, गुटखा उत्पादक, ...

Gutkha sales due to poached system | पोखरलेल्या यंत्रणेमुळे राजरोसपणे गुटख्याची विक्री

पोखरलेल्या यंत्रणेमुळे राजरोसपणे गुटख्याची विक्री

googlenewsNext

धायरी : महाराष्ट्रात गुटखाबंदी केली असली तरी गुटखाबंदी झाल्यानंतर सुरुवातीला काही काळ गुटखा उत्पादक धास्तावले होते. मात्र, गुटखा उत्पादक, विक्रेत्यांनी समांतर व्यवस्था उभी करून बेकायदा गुटखाविक्रीचे जाळे निर्माण केले. गुजरात आणि कर्नाटक भागातील उत्पादकाकडून येणारा अवैध गुटखा सिंहगड रस्ता परिसरातील किरकोळ विक्रेत्यांकडे येत आहे, हप्तेखोरी, पोखरलेल्या यंत्रणेमुळे सिंहगड रस्ता परिसरात गुटखा विक्री राजरोसपणे सुरू आहे.

राज्य शासनाने गुटखाविक्रीवर बंदी घातली असली, तरी या बंदीच्या आदेशाची पायमल्ली करून सिंहगड रस्ता परिसरात मोठ्या प्रमाणावर गुटख्याची सर्रास विक्री होताना दिसत आहे. पानाच्या दुकानांमधून (टपऱ्या) तसेच किराणा दुकानातून मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचा गुटखा विकला जात आहे. पोलीस तसेच अन्न व औषध विभागाची मेहेरनजर या व्यावसायिकांवर असल्याने बेकायदा विक्री फोफावत चालली आहे. विशेष म्हणजे सहज कुठेही गुटखा उपलब्ध होत आहे. यात गुटखा विक्रेत्यांची चांदी होत असली तरी तरुणवर्ग मात्र व्यसनाच्या आहारी जात आहे.

गुटखाबंदीचा कायदा करून सरकारने गुटखाविक्री तसेच उत्पादन व वाहतूक यांवर निर्बंध लादले. कायदा न मोडता तो पद्धतशीरपणे वाकविण्याची वृत्ती असलेल्या महाभागांनी सुपारी व तंबाखू आशा दोन पुड्या तयार करून यापासून पळवाट काढण्याचा प्रयत्न केला. सरकारने तोही हाणून पाडत अशा प्रकारच्या उत्पादनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र, हे आदेश झुगारून लावत प्रशासनाबरोबरच अर्थपूर्ण संबंध व्यावसायिकांनी तयार करीत अशा उत्पादनांची विक्री सुरूच ठेवली आहे.

तरुणांमध्ये या व्यसनाचे प्रमाण वाढत असून डोळेझाक करणारी सरकारी यंत्रणा याला कारणीभूत असल्याचे मत अनेक पालकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

चौकट

हप्तेखोरीमुळे यंत्रणा पोखरलेली...

जुजबी कारवाई करून गुटखाविक्रेते आणि उत्पादकांमध्ये दहशत निर्माण करायची आणि त्या बदल्यात गुटखा उत्पादकांकडून हप्ते घ्यायचे, असा प्रकार सुरू असल्याने गुटखाबंदीचा आदेश नावापुरता आहे की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. पोलीस तसेच अन्न व औषध विभागातील काहींच्या छुप्या पाठिंब्यावरच सिंहगड रस्ता परिसरात गुटखाविक्रीचे जाळे निर्माण झाले असल्याचे येथील नागरिकांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Gutkha sales due to poached system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.