पिंपरीत किराणा दुकानातून 'एक लाखांपेक्षा' जास्त किंमतीचा गुटखा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 04:16 PM2021-11-15T16:16:04+5:302021-11-15T16:24:53+5:30
विक्रीसाठी किराणा दुकानात ठेवलेला एक लाख ९५ हजार १७० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला
पिंपरी : विक्रीसाठी किराणा दुकानात ठेवलेला एक लाख ९५ हजार १७० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला, याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. सामाजिक सुरक्षा विभागाने संत तुकाराम नगर, पिंपरी येथे शनिवारी (दि. १३) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ही कारवाई केली.
तेजमल हरकचंद सुंदेचा (वय ४२), राजेंद्र किसन साठे (वय ४९, दोघे रा. संत तुकाराम नगर, पिंपरी), अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्यासह सागर पाटील याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस फौजदार विजय कांबळे यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजमल याचे संत तुकाराम नगर येथे कानिफनाथ जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात एक लाख ९५ हजार १७० रुपयांचा गुटखा विक्रीसाठी ठेवला. राजेंद्र याने त्याची खोली गुटखा साठवणूक करण्यासाठी उपलब्ध करून दिली. तर आरोपी सागर पाटील याने गुटखा विक्रीसाठी आरोपी तेजमल याला पुरवला. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी कारवाई करत गुटखा जप्त करून दोघांना अटक केली.