"ग्यानबा तुकाराम ज्ञानोबाची पालखी", अन् टाळ - मृदंगाच्या तालावर आज निघणार संत तुकारामांची पालखी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 11:15 AM2021-07-01T11:15:43+5:302021-07-01T12:52:18+5:30
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देहूनगरीत सर्वत्र शुकशुकाट
पुणे: ग्यानबा तुकाराम ज्ञानोबाची पालखी अशा उत्साहपूर्व वातावरणाच्या गजरात आणि टाळ - मृदंगाच्या तालावर श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान होणार आहे. दरवर्षी सकाळपासूनच संपूर्ण देहूगाव संतांच्या आणि विठ्ठलाच्या गजराने दुमदुमून जाते. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र शुकशुकाट दिसून आला आहे.
आज दुपारी २ वाजता तुकाराम महाराजांच्या मंदिरापासून पालखी सोहळ्याला सुरुवात होईल. सकाळपासूनच भजने, कीर्तने कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. मंदिराच्या आसपास पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गर्दी न होण्याच्या दृष्टीने मंदिराचे ट्रस्टी आणि प्रशासनाकडून उत्तम प्रकारे काळजी घेतली जात आहे.
दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून असंख्य वारकरी देहूगावात येत असतात. प्रस्थान होण्याच्या आदल्या दिवशी सर्वत्र वारीचे उत्साहपूर्व वातावरण दिसून येते. माउली- तुकारामांच्या गजरात देहूनगरी दुमदुमून जाते. यंदा मात्र मागच्या वर्षीप्रमाणेच कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच विठ्ठलाला भेट देण्यासाठी ज्ञानेश्वर - तुकारामांच्या पादुका बसने जाणार आहेत. प्रशासनाकडून मर्यादित वारकऱ्यांनाच परवानगी देण्यात आली आहे.
यंदाही मंदिराच्या आसपासच्या परिसरात शुकशुकाट असला तरी पालखीच्या प्रस्थानाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. मंदिराबाहेर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याठिकाणी वारकरी, ट्रस्टी यांच्या तपासणीसाठी डॉक्टर आणि नर्सही तैनात आहेत. दुपारी २ च्या प्रस्थान सोहळ्यानंतर पादुका मुख्य मंदिरात राहणार आहेत. १९ जुलैला सकाळी ९ वाजता पादुका पंढरपूरकडे शासनाच्या बसने जातील. त्यानंतर १९ जुलै ते २४ जुलैपर्यंत पादुका पंढरपूरमध्ये राहतील.
संत तुकाराम महाराजांच्या रथाला फुलांची सजावट
संत तुकाराम महाराजांच्या चांदीच्या रथाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. गावकरी रथाचे दर्शनही घेत आहेत. लक्षवेधी रथ हा दरवर्षी पालखीचे आकर्षण ठरत असतो.