ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात पुणेकर दंग

By admin | Published: June 19, 2017 05:24 AM2017-06-19T05:24:26+5:302017-06-19T05:24:26+5:30

‘माऊली माऊली’, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असा अखंड जयघोष, टाळ-मृदंगाचा गजर करीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व जगद्गुरू तुकाराम यांच्या पालख्यांचे रविवारी पुण्यात आगमन झाले.

Gyanoba-Tukoba's pistol | ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात पुणेकर दंग

ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात पुणेकर दंग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘माऊली माऊली’, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असा अखंड जयघोष, टाळ-मृदंगाचा गजर करीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व जगद्गुरू तुकाराम यांच्या पालख्यांचे रविवारी पुण्यात आगमन झाले. लाखो वारकऱ्यांचा भक्तिरसात रंगलेला मेळा शहरात दाखल झाल्याने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले. स्वागतासाठी रांगोळ््यांच्या घालण्यात आलेल्या पायघड्या, चिमुकल्यांचे नृत्य, व्यसनविरोधी प्रबोधनात्मक कार्यक्रम रंगले.
संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीचे कळस येथे साडेबारा वाजता व संत तुकाराममहाराज यांच्या पालखीचे बोपोडीत सव्वाएक वाजता आगमन झाले. महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह पालिकेचे पदाधिकारी व नगरसेवक यांनी पालख्यांचे शहरात स्वागत केले. पालख्यांच्या स्वागतासाठी पालिका प्रशासन, स्वयंसेवी संस्था व पुणेकर नागरिकांकडून जय्यत तयारी करण्यात आली होती.
तुळशीवृंदावने व जलकलश घेतलेल्या महिला, भगवे ध्वज, फेटे आणि उपरणी परिधान केलेले वारकरी पुण्यनगरीत प्रवेशले आणि प्रसन्नपणाची अनुभूती भाविकांना सुखावून गेली.
आधारआश्रम या संस्थेतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. कितीही संकट आले तरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नका, असे कळकळीचे आवाहन ही मुले करीत होती. तंबाखूच्या व्यसनाविरोधात जागृती करणारे कार्यक्रम या वेळी सादर करण्यात आले.
फर्ग्युसन रस्त्यावर पालख्यांच्या स्वागतासाठी उसळणाऱ्या तरुणाईची गर्दी यंदा कमी होती. भारत व पाकिस्तानच्या क्रि केट सामन्यामुळे ही संख्या कमी असल्याचे जाणवत होते. मात्र यामुळे भक्तिभावाने आलेल्या अनेक भाविकांना पालख्यातील पादुकांचे मनसोक्तपणे दर्शन घेता आले. अनेकदा प्रचंड गर्दीमुळे रेटारेटी होऊन पालखीपर्यंत पोहोचणे भाविकांना अशक्य होत होते.
बहुतांश संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज यांच्या पालखीचे शहरात आगमन होताच पावसाच्या धारांनी त्यांचे स्वागत होते. मात्र यंदा पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. पालख्यांच्या दर्शनासाठी भाविकांची पाटील इस्टेट व संगमवाडी नवा पूल परिसरात मोठी गर्दी झाली होती. भरउन्हातही रस्त्याच्या दुतर्फा हाती अक्षता, फुले आणि तुळशीची पाने घेऊन भाविक वाट पाहत होते.

‘माऊली’वर थिरकली चिमुकली
एआरडीएस या हेमंत पवार यांच्या वारजेतील डान्स अ‍ॅकॅडमीतर्फे ज्ञानेश्वरमहाराज व तुकाराममहाराज यांच्या पालखीच्या स्वागताला त्यांच्या नृत्य संस्थेतील लहान मुलांच्या स्वरुपातील विठ्ठल-रुक्मिणी हे आकर्षण होते. नंतर या संस्थेतील इतर मुलांसह डेक्कन कॉर्नर येथील चौकात लय भारी या चित्रपटातील माऊली माऊली या गाण्यावर सुंदर नृत्य सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. सर्व वारकरीबांधवांनी आमच्या या नृत्याचा आनंद घ्यावा, अशी माफक अपेक्षा आमची आहे, असे या संस्थेचील कादंबरी यांनी सांगितले.

Web Title: Gyanoba-Tukoba's pistol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.