जिल्ह्यातील समाजमंदिरे होणार ज्ञानमंदिरे
By admin | Published: April 11, 2016 12:39 AM2016-04-11T00:39:57+5:302016-04-11T00:39:57+5:30
समाजकल्याण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या समाजमंदिरात काय चालते? असे जर एखाद्या गावात जाऊन पाहिले तर ते रिकामटेकड्यांचा जुगाराचा अड्डा झाल्याचे चित्र आहे
पुणे : समाजकल्याण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या समाजमंदिरात काय चालते? असे जर एखाद्या
गावात जाऊन पाहिले तर ते रिकामटेकड्यांचा जुगाराचा अड्डा झाल्याचे चित्र आहे. तसेच एका एका गावात अनेक देवांच्या नावांनी ही समाजमंदिरे उभारली गेली; पण त्यांची दुरवस्था झाली आहे. ग्राम अभ्यासिकेच्या निमित्ताने हे चित्र बदलणार असून, ही मंदिरे आता ज्ञानमंदिरे होणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा मूलमंत्र दिला. हा मूलमंत्र डोळ्यांसमोर ठेवून जिल्हा परिषद प्रशासनातर्फे ही अभ्यासिका शाहू, फुले व आंबेडकर यांच्या नावाने सुरू करण्यात येणार असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.
खेडोपाड्यातील मुलं शिकली, मोठी झाली तर हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली असू शकते, म्हणून पहिल्या टप्प्यात ७५ ग्राम अभ्यासिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक जिल्हा परिषद गटात एक याप्रमाणे या अभ्यासिका होणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सांगितले. यासाठी चालू वर्षीच्या अंदाजपत्रकात १0 कोटी प्रस्तावित केले असून, मूळ अंदाजपत्रकामध्ये २ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या अभ्यासिकेत किमान पहिल्या टप्प्यात १ हजार पुस्तकं ठेवली जाणार असून, तिच्या देखभालीसाठी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. त्याचे मानधन ग्रामपंचायत देईल. (प्रतिनिधी)थोर पुरुषांचे स्मरण फक्त जयंतीनिमित्तच न करता त्यांच्या विचारांची व कार्याची प्रेरणा कायम स्मरणात राहावी, सातत्याने त्यांचे विचार समाजात रुजावेत यासाठी या अभ्यासिका करीत आहोत.
- प्रदीप कंद,
अध्यक्ष, जिल्हा परिषद