‘एनएच ९६५’चे बाधित शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:37 AM2018-09-15T00:37:16+5:302018-09-15T00:37:40+5:30
उपोषणाचा पाचवा दिवस; काही शेतकऱ्यांना जमिनींचे अधिग्रहण केल्याची माहितीच नाही; प्रांताधिकाऱ्यांनी विश्वासात न घेतल्याचा आरोप
इंदापूर : इंदापूर तालुक्यातून प्रस्तावित असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ च्या कामाला सुरुवात झाली असून, शासनाने काही इंग्रजी व मराठी वर्तमानपत्रांतून भूमी अधिग्रहण केल्याचे राजपत्र जाहीर केले. परंतु राजपत्रात ज्या शेतकºयांची नावे आहेत, त्यांतील काही शेतकºयांना अजूनपर्यंत शासनाची कोणतीही नोटीस आलेली नाही. शासनाच्या या अनागोंदी कारभारामुळे शेतकरी आक्रमक झाले असून संपूर्ण माहिती मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवणार असल्याची माहिती कृती समितीचे सल्लागार अॅड. राहुल मखरे यांनी दिली. शुक्रवारी संपाचा पाचवा दिवस होता.
राष्ट्रीय महामार्गाच्या जमिनी शासनाच्यावतीने ताब्यात घेण्यास जलदगतीने हालचाली सुरू आहेत. ज्या जागेतून महामार्ग जाणर आहे, त्यातील गायरान जागेत राहणाºया कुटुंबांना काय मोबदला मिळणार? असा सवाल गायरानातील शेकडो कुटुंबे शासनाला विचारत आहेत. शेतकºयांना विश्वासात न घेता, अधिग्रहण चालू असल्याचा आरोप कृती समितीच्यावतीने प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्यावर करण्यात आला आहे.
भूमिअधिग्रहण करण्यासंदर्भात बाधित शेतकरी समितीकडून १ सप्टेंबर रोजी संपूर्ण माहिती मागण्यात आली होती. ती उपलब्ध झाली नसल्याने शेतकºयांनी १० सप्टेंबर रोजी साखळी उपोषणाला सुरुवात केली असून, शुक्रवारी या संपाचा पाचवा दिवस होता. शेतकºयांच्या समस्यांची शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसून त्यांना कधी न्याय मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
साखळी उपोषणाच्या ठिकाणाला प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी भेट देऊन बाधित शेतकºयांच्या समस्या जाणून घेतल्या. बाधित नसणारेच लोक आंदोलन करीत आहेत, असे दिशाभूल करणारे वाक्य ते बोलताच गायरान बाधित लोक आक्रमक झाले. यामुळे वातावरण काही काळ तंग झाले होते. यावेळी राजेंद्र कुरुळे, अशोक भोसले, नेताजी लोंढे, मंगेश घाडगे, महेश लोंढे, केशव सुर्वे, महेश भाळे, प्रकाश चौगुले आदी गायरान बाधित शेतकरी उपस्थित होते.
बारामती उपविभागीय प्रांताधिकारी शेतकऱ्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप
बारामती उपविभागीय प्रांताधिकारी हेमंत निकम हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ च्या भूमिअधिग्रहणाच्या कामात कसूर करीत आहेत. बाधित शेतकºयांना विश्वासात न घेता, ज्या कंपनीला काम दिले आहे त्या कंपनीच्या बाजूने अनुकूल निर्णय ते घेत आहेत. यामुळे त्यांची बदली करून या कामासाठी सक्षम अधिकाºयांची नियुक्ती करण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन कृती समितीचे अध्यक्ष बाबासाहेब भोंग, उपाध्यक्ष राहुल शिंगाडे, महासचिव संजय कांबळे, कार्याध्यक्ष दत्तात्रय मिसाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.