Positive Story: पुण्यात 'H3 N2' आटोक्यात; जानेवारीपासून आतापर्यंत आढळले ८७ रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 03:37 PM2023-03-26T15:37:31+5:302023-03-26T15:38:33+5:30
‘एच३ एन२’ हा हंगामी साथ पसरवणाऱ्या इन्फ्लूएंझा ‘ए’ या विषाणूचा उपप्रकार असून ताप, खाेकला, घसा खवखवणे, थकवा ही लक्षणे
पुणे: गेल्या दीड ते दाेन महिन्यांपासून पुणेकरांना बेजार करणाऱ्या ‘एच३ एन२’ व्हायरसच्या रुग्णांना ओहाेटी लागल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. पुणेकरांना दिलासा देणारी ही बातमी आहे. या विषाणूंची संख्या राेडावत असून, जानेवारीपासून आतापर्यंत ८७ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १२ जणांवर हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
‘एच३ एन२’ हा हंगामी साथ पसरवणाऱ्या इन्फ्लूएंझा ‘ए’ या विषाणूचा उपप्रकार आहे. सर्वसामान्य फ्लू सारखीच लांबलेला ताप, खाेकला, घसा खवखवणे, थकवा ही लक्षणे याची आहेत. महापालिकेच्या डाॅ. नायडू हाॅस्पिटलमधून तसेच १२ स्वॅब सेंटरमधून जानेवारीपासून व्हायरल इन्फेक्शन झालेल्या काही रुग्णांचे नमुने ‘एनआयव्ही’कडे पाठवण्यात येत आहेत. त्यापैकी ५ मार्चपर्यंत जे काही नमुने पाठवले त्यापैकी ४६ रुग्णांना ‘एच३ एन२’ झाल्याचे निदान झाले आहे. महापालिकेचा आराेग्य विभाग या नमुन्यांचे दैनंदिन ट्रॅकिंग करत आहे. त्यापैकी १७ आणि १८ मार्च राेजी अनुक्रमे १२ आणि १४ रुग्णांचे अहवाल या विषाणूसाठी पाॅझिटिव्ह आले. आता ही संख्या दहाच्या आतच आली आहे.
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या म्हणजेच ‘एनआयव्ही’च्या अहवालानुसार गेल्यावर्षी डिसेंबरपासूनच पुण्यात एच३ एन२ विषाणूंची रुग्णसंख्या वाढत आहे. तपासणीसाठी आलेल्या एकूण रुग्णांच्या नमुन्यातील काेराेना व स्वाइन फ्लू पेक्षाही ‘एच३ एन२’ या विषाणूने बाधित असलेले रुग्ण जास्त असल्याचे दिसून आले. फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याचे रुग्ण सर्वाधिक दिसून आले. त्याचवेळी आयसीएमआरने रुग्णांना काेणते उपचार द्यायचे याच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या हाेत्या. साेबत रुग्णांच्या लक्षणांवरून त्याची वर्गवारी करून त्यावर उपचार करण्याच्या मार्गदर्शक सूचना केंद्रीय आराेग्य विभागाने जारी केल्या हाेत्या.
''शहरात ‘एच ३ एन २’च्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी हाेत आहे. ही बाब दिलासादायक आहे. यातील एका संशयिताचा मृत्यू झाला असून, त्याला इतरही व्याधी हाेत्या. त्याच्या मृत्यूचे ऑडिट झाल्यावर त्याचा नेमका मृत्यू कशाने झाला हे कळेल. - डाॅ. सूर्यकांत देवकर, साथराेग अधिकारी, पुणे मनपा''