" फिजिकल डिस्टन्स आड आले नाहीतर मिठी मारली असती..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 12:56 PM2020-04-24T12:56:12+5:302020-04-24T13:03:19+5:30

ज्या भागात आपण लहानाचे मोठे झालो तिथे पोलीस कडेकोट बंदोबस्त ठेऊन आपल्या सुरक्षेसाठी झटत आहेत. ही जाणीव ठेवून सुरुवातीला त्यांना आल्याचा, तुळशीचा चहा देण्यास सुरुवात केली...

Had it not been for the physical distance, I would have hugged ... | " फिजिकल डिस्टन्स आड आले नाहीतर मिठी मारली असती..."

" फिजिकल डिस्टन्स आड आले नाहीतर मिठी मारली असती..."

Next
ठळक मुद्दे शेफ आणि सेलिब्रिटी पराग कान्हेरे यांचा उपक्रम आल्याच्या, तुळशीचा चहा आणि वडापावसाठी पोलिसांकडून आभार

युगंधर ताजणे -
पुणे : लॉकडाऊन झाल्याचे कळल्यानंतर जे दिवसरात्र आपल्यासाठी कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी काही करायला हवे ही भावना स्वस्थ बसू देईना. ज्या भागात आपण लहानाचे मोठे झालो तिथे पोलीस कडेकोट बंदोबस्त ठेऊन आपल्या सुरक्षेसाठी झटत आहेत. ही जाणीव ठेवून सुरुवातीला त्यांना आल्याचा, तुळशीचा चहा देण्यास सुरुवात केली. तो चहा पिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान याची गोष्टच वेगळी आहे. यानंतर पोलिसासाठी खास पॅकेजीग वडापाव देऊ लागलो. तेव्हा एका पोलिसाने 'साहेब , सोशल डिस्टन्सचे बंधन आहे नाहीतर, कडकडीत मिठी मारून आपल्याला धन्यवाद दिले असते.' अशी भावना व्यक्त केली. अजून काय हवे होते ? बिग बॉस फेम आणि शेफ पराग कान्हेरे आपल्या नवीन उपक्रमाबद्दल बोलत होते. 
झोन 3 मध्ये येणारे सहायक पोलिस आयुक्तालय, तसेच सिंहगड, अलंकार, दत्तवाडी, वारजे, कोथरूड, उत्तमनगर या भागातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांसाठी पराग कान्हेरे आणि त्यांचे सहकारी यांनी वडापावचे वितरण सुरू केले आहे. पोलिसांकडून याला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमासाठी त्यांना अलंकार पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी राजेश तटकरे, कल्पना जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच झोन 3 च्या पोलीस उपआयुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडून वडापाव वितरणाची परवानगी घेतली. त्यांनी सांगितलेले नियम आणि काळजी यांचे काटेकोर पालन करून ही सुविधा पोलिसांना देण्यात आली आहे. याविषयी अधिक माहिती देताना कान्हेरे म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून वडापाव वितरण करण्यास सुरुवात केली आहे. एका दिवसाला साधारण 500 वडापाव आम्ही देत आहोत. खरं तर या दिवसांत आम्हाला आमचा 'बिग वडापाव' नावाने नवीन सुरुवात करायची होती. मात्र लॉकडाऊनमुळे ते काम शक्य झाले नाही.


दुपारी चार ते रात्री आठ या वेळेत वडापावचे वितरण करण्यात येते. सुरुवातीला इतर झोनचा देखील विचार केला होता. मात्र तेथील पोलिसांची संख्या, तसेच त्या भागातील सद्यस्थिती याच्या काही मयार्दा असल्याने झोन 3 मध्ये काम सुरू केले. यापुढील दिवसांत पिंपरी चिंचवड भागात देखील पोलिसांना ही सुविधा देण्यात येणार आहे. या कामात कुंदन देवघरे, बळीराम चव्हाण, दीपेश निरवार, महेश सुरवसे आणि औदुंबर देवकर यांचे सहकार्य लाभले असल्याचे कान्हेरे यांनी यावेळी सांगितले. 

* डोळ्यात पाणी येते..
अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीत बालपण गेले. तिथे लहानाचा मोठा झालो. खूप साऱ्या आठवणी आहेत. अशावेळी आपण एक सेलिब्रिटी म्हणून लोकांना घरात बसा, घरात राहण्याचे आवाहन करणे महत्वाची गोष्ट आहे. आमची सुरुवात चहा देण्यापासून झाली. पोलिसांना आल्याचा, मसाल्याचा, तुळशीचा चहा देऊ लागलो. त्यांना खूप बरे वाटले. आपल्यासाठी देखील कुणी काही करत आहे, आपली काळजी घेत आहे याचा त्यांना आनंद वाटला. हे सगळे व्यक्त होत असताना त्यांच्या डोळ्यात येणारे पाणी खूप काही सांगून जाणारे होते अशी भावना पराग यांनी व्यक्त केली.

Web Title: Had it not been for the physical distance, I would have hugged ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.