रोहित माझे नाव घेईल याची कल्पना नव्हती; सुखद धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 03:14 PM2019-11-27T15:14:31+5:302019-11-27T15:14:47+5:30
विधान भवनात शपथ घेताना तो माझे नाव घेईल, याची मला कल्पना नव्हती..
बारामती :जे आतापर्यंत कोणी केले नव्हते ते रोहितने केले. विधान भवनात शपथ घेताना तो माझे नाव घेईल, याची मला कल्पाना नव्हती. ज्यावेळी त्याने मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार असा उल्लेख केला. तेंव्हा सुखद धक्का बसला.प्रथमच कोणत्याही आमदाराने शपथ घेतेवेळी आईच्या नावाचा उल्लेख केला. एका आईला जे समाधान वाटेल तेच समाधान आज मला वाटत आहे. रोहितने राज्यात आदर्शवत ठरावं असं काम करावे, एवढीच माझी अपेक्षा आहे, अशी भावना आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी व्यक्त केली.
आमदार रोहित पवार यांनी आज विधानभवनामध्ये विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेताना मी आमदार रोहित सुनंदा राजेंद्र पवार असा उल्लेख केल्याने सभागृहातील सदस्यांना देखील सुखद धक्का बसला. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार असणाऱ्या रोहित पवार यांनी आमदारकीची शपथ घेताना आपले वेगळेपण दाखवून दिले. एकीकडे सर्व आमदारांनी आपले संपूर्ण नाव घेत शपथ घेतली. मात्र रोहित पवार यांनी शपथ घेण्यास सुरुवात करताना आवर्जून आपल्या आईचे नावही घेतले.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये रोहित यांनी माजीमंत्री राम शिंदे यांचापराभव करत विधानसभेची निवडणूक जिंकली. यापार्श्वभूमीवर ' लोकमत 'शीबोलताना सुनंदा पवार म्हणाल्या, तब्येत बरी नसल्याने मी शपथविधीसाठी जाऊशकले नाही. सध्या बारामतीतच आहे. मात्र कुटूंबातील इतर सदस्य शपथविधीसाठी उपस्थित राहिले. मागील काही दिवसांपासून घरामध्ये तणावाची परिस्थिती होती. तो सर्व तणाव आता निवळला आहे. महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते जेवढं पवार साहेबांवर प्रेम करतात तेवढंच प्रेम अजितदादांवर देखील प्रेम करतात. आमचं कुटूंब अखंड आहे आणि राहणार, असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला. तसेच ज्या कर्जत-जामखेड मतदार संघाने रोहितला निवडुन दिले त्या मतदार संघामध्ये आदर्शवत काम त्याने उभे करावे. मतदारांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. त्या भागात रस्ते, पाणी आणि विजेची समस्या आहे. आमदार होण्याच्या आधीपासूनच त्याने या कामामध्येस्वत:ला झोकून दिले आहे. आता सुद्धा त्याच्या प्रत्येक कामामध्ये आम्ही कुटूंब म्हणून सोबत असणार आहोत, अशा भावना सुनंदा पवार यांनी व्यक्त केल्या.
----------------------------