हडपसरमध्ये नगरसेवकानेच उखडून काढला सायकल ट्रॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 05:37 PM2021-10-25T17:37:47+5:302021-10-25T17:46:11+5:30
हडपसर : वाहतुकीला अडथळा ठरत असलेला येथील उड्डाणपूलाजवळील मगरपट्टा चौक ते हडपसर दरम्यानचा सुमारे दोनशे मीटर लांबीचा सायकल ट्रॅक नगरसेवक ...
हडपसर: वाहतुकीला अडथळा ठरत असलेला येथील उड्डाणपूलाजवळील मगरपट्टा चौक ते हडपसर दरम्यानचा सुमारे दोनशे मीटर लांबीचा सायकल ट्रॅक नगरसेवक योगेश ससाणे यांनी जेसीबी यंत्राच्या साह्याने उखडून टाकला आहे. अनेक वेळा महापालिकेला निवेदने देऊनही अडचणीचा ठरत असलेला हा ट्रॅक पालिकेकडून काढला जात नसल्याने ही कृती करावी लागल्याचे त्यांनी सांगितले.
हडपसर येथील पुणे सोलापूर मार्गावरील उड्डाणपूलाच्या सुरवातीला व कामधेनू सोसायटी समोर सायकल ट्रॅक होता. मात्र, हा ट्रॅक केवळ वाहने उभी करण्यासाठी वापरला जात होता. ट्रॅकमुळे मुख्य रस्ता अरूंद झाला होता. 15 वर्षापासून येथे हा ट्रक होता.
सोलापूरकडे जाताना पूलावर व पूलाच्या बाजूने जाणाऱ्या वाहनांचा गोंधळ उडत असे. नगरसेवक योगेश ससाणे यांनी याबाबत वारंवार निवेदने देवून प्रशासनाकडे हा ट्रॅक काढून रस्ता रूंद करण्याची मागणी केली होती. मात्र, त्याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने आज जेसीबी लावून हा संपूर्ण ट्रॅक उखडून टाकला आहे. नागरिकांची व प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन ही कृती केली असल्याचे त्यांनी सांगितले.
हडपसर उड्डाणपुलाशेजारी अनेक वर्षापासून वाहतुक कोंडी होत आहे. उड्डाणपुलावर जाताना वाहनचालकांचा गोंधळ उडत होता. अनेक अपघात येथे होत आहेत. विनावापर सायकल ट्रॅक काढलाय तर रस्त्याची रुंदी वाढेल आणि वाहतुक सुरळीत होईल.
-योगेश ससाणे, नगरसेवक पुणे मनपा