हडपसर-हवेली महापालिका
By Admin | Published: May 14, 2015 04:15 AM2015-05-14T04:15:49+5:302015-05-14T04:15:49+5:30
हडपसर-हवेली या स्वतंत्र महापालिकेच्या स्थापनेबाबत राज्य शासनाने पालिका प्रशासनाकडून अभिप्राय मागविला होता. या अभिप्रायावर तटस्थ
पुणे : हडपसर-हवेली या स्वतंत्र महापालिकेच्या स्थापनेबाबत राज्य शासनाने पालिका प्रशासनाकडून अभिप्राय मागविला होता. या अभिप्रायावर तटस्थ भूमिका घेत महापालिका प्रशासनाकडून नव्या महापालिकेचा निर्णय मुख्य सभेच्या कोर्टात ढकलला आहे.
पुणे महापालिकेच्या हद्दीत फेरबदल होणार असल्याने त्यावर मुख्य सभेनेच निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला असल्याची माहिती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी बुधवारी दिली. येत्या २० मे रोजी होणाऱ्या मुख्य सभेत या नव्या महापालिकेच्या स्थापनेसाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
पुणे महापालिका हद्दीलगतची ३८ गावे पालिकेत समाविष्ट करण्यास मुख्य सभेने मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाकडे आहे. मात्र, गावांच्या समावेशाऐवजी हडपसर-हवेली या स्वतंत्र महापालिकेची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार व तत्कालीन आमदार महादेव बाबर यांनी २०१३ मध्ये मुख्यमंत्र्यांकडे या स्वतंत्र महापालिकेच्या स्थापनेची मागणी केली होती. यंदाच्या अधिवेशनात हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांनी हडपसरसाठी स्वतंत्र महापालिकेच्या स्थापनेची मागणी केली होती. त्यावर नगरविकास खात्याने मार्च महिन्यात महापालिकेकडून हडपसर-हवेली या स्वतंत्र महापालिकेच्या स्थापनेबाबत अभिप्राय मागविला होता. महापालिकेच्या संमतीने महापालिका हद्दीत शासनाकडून फेरबदल करण्याची तरतूद आहे. तसेच स्वतंत्र महापालिकेच्या स्थापनेमुळे पुणे पालिकेच्या हद्दीत फेरबदल होणार आहे. त्यामुळे मुख्य सभेनेच निर्णय घ्यावा, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.