पोलिस ठाणे २४ तास; कामे मात्र कर्मचाऱ्यांच्या सोयीनेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 09:52 IST2025-04-09T09:50:31+5:302025-04-09T09:52:02+5:30

सकाळी नऊ वाजता पहिल्या शिफ्टमधील पोलिस कर्मचारी व अधिकारी आले.

hadapsar police station pune Although the police station is open 24 hours, work is done according to the convenience of the employees. | पोलिस ठाणे २४ तास; कामे मात्र कर्मचाऱ्यांच्या सोयीनेच

पोलिस ठाणे २४ तास; कामे मात्र कर्मचाऱ्यांच्या सोयीनेच

जयवंत गंधाले

हडपसर :
सातही दिवस चोवीस तास सुरू नागरिकांच्यासाठी उपलब्ध असलेल्या पोलिस ठाण्यात मात्र येणाऱ्या माणसाने आपला अधिकचा वेळच काढून यावे. कारण येथे २४ तास पोलिस ठाणे सुरू असले तरी मात्र आपल्याला सेवा ही त्यांच्या वेळेनुसारच मिळणार आहे. हे पोलिस ठाण्याची पायरी चढून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला समजते. येथे मदतीसाठी येणारा तक्रारदार हा भीतीच्या वातावरणात असल्याचेच दिसतो.

गुरुवारी नेहमीप्रमाणे पोलिस ठाण्याचा कारभार दोन शिफ्ट मध्ये झाला. सकाळी नऊ वाजता पहिल्या शिफ्टमधील पोलिस कर्मचारी व अधिकारी आले. सकाळी सगळ्यांना फॉलोईन करून सूचना देण्यात आल्या आणि प्रत्येकाची कामे वाटून दिल्याने येथे जो तो आपापल्या कामात व्यस्त असल्याचे दिसते. पोलिस ठाण्यात चक्कर मारून आल्यावर लॉकअपमध्ये १४ आरोपी ठेवल्याचे दिसले. त्यातील एका आरोपीला जेवण देण्यासाठी त्याचे नातेवाइक आले होते. मात्र ते नियमानुसार देऊ शकत नसल्याचे सांगून फक्त ब्रश व टूथपेस्ट देण्यासाठीची परवानगी कर्मचाऱ्यांनी दिली. मात्र एवढे देण्यासाठी त्या नातेवाइकांना सुमारे एक ते दीड तास वेळ द्यावा लागला. तपास कोणाकडे आहे. त्यांच्याशी बोलून काय दिले जावे काय देऊ नये. याची खात्री करून पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडील वस्तू आरोपीला दिल्या.

सकाळी नऊ वाजता हजेरी झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले हे न्यायालयीन कामासाठी निघून गेले. त्यानंतर दिवसभर गुन्हे पोलिस निरीक्षक निलेश जगदाळे हे पोलिस ठाण्याचा कारभार सांभाळत होते. त्यांच्या केबिनमध्ये येणाऱ्या नागरिकांबरोबर पोलिस ठाण्याच्या प्रत्येक विभागात सुरू असलेल्या कामावर त्यांचे लक्ष होते. दुपारी दीडच्या सुमारास जेवणाच्या वेळेत सगळेच कर्मचारी एकदम जेवायला गेले. त्यांना रिलिव्हर नव्हता. त्यामुळे त्या दरम्यान दोन नागरिक चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी आले त्यांना मात्र बराच वेळ थांबावे लागले. कर्मचारी जेवणासाठी गेले असल्याने थांबावे लागेल असे त्यांना सांगितले गेले.

जेवण करून साधारण दीड तासाने कर्मचारी परत आले आणि चारित्र्य पडताळणी संदर्भातील काम सुरू केले गेले. चारित्र्य पडताळणी विभागात सध्या दहा ते पंधरा लोकांची रोज पडताळणी होत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. सकाळी अकराच्या सुमारास पासपोर्टसाठी सकाळी तीन लोक आले होते. पासपोर्ट कार्यालयाकडून २१ दिवसात पडताळणी करून घ्यावे, अशी सूचना दिली असल्यामुळे पोलिस त्यांच्या घरी जाऊन पडताळणी करत असतात. तरीही येथे गर्दी का, असा एक प्रश्न पडला. त्यामुळे कर्मचाऱ्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की, काही नागरिकांचे पासपोर्ट संबंधीचे कागदपत्रे कमी असल्याने पासपोर्टचे व्हेरिफिकेशन होते. दिवसभरातील हा आकडा सांगता येणार नाही असे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले ते सांगण्याचा अधिकार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

स्तनपान गृहात इतर कामकाज सुरूच

पहिल्या मजल्यावर बालस्नेही कक्ष असून येथे पोलिस महिला कर्मचाऱ्यांना स्तनपान करण्यासाठी अथवा महिलांना त्याचप्रमाणे आरोपी यांच्या लहान मुलांसाठी हा कक्ष असला तरी सध्या या कक्षात तीन टेबल खुर्च्या ठेवून आणि कामकाजही चालू असल्याचे दिसले.

अनेक कक्ष अंधारात

त्याचप्रमाणे पहिल्या मजल्यावर पत्रव्यवहार हा खात्यांतर्गत पत्रव्यवहारासाठी वेगळा विभाग आहे. गुन्हे रेकॉर्ड ठेवण्यासाठी रेकॉर्डचा विभाग, मालमत्ता ठेवण्यासाठी वेगळा मालमत्ता विभाग आहे. येथे ड्युटी बटवडा विभाग आहे. येथील कर्मचारी विभागातून बाहेर जाताना लाईट अथवा फॅन बंद न करता जात असतात. तासनतास विजेचा वापर होत असतो. मात्र याकडे लक्ष दिले जात नाही. गुरुवार असल्याने वारंवार वीज जात असल्याने येथील सर्व अनेक विभागात अंधार पडत होता. काही वेळी इन्व्हर्टर सुरू होता. तर काही काळ अंधारातच येथील कर्मचाऱ्यांना बसावे लागत होते.

सायंकाळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक उपलब्ध

सायंकाळी चारच्या दरम्यान वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले न्यायालयातील काम उरकून आले. मात्र ते पाच वाजता नागरिकांसाठी त्यांच्या कार्यालयात भेटीसाठी उपलब्ध झाले. सकाळी नऊ ते पाच या वेळेत येथील कामकाजात अनेक लोक येत जात होती. प्रत्येकाच्या समस्या तक्रारी वेगळ्या होत्या. काहींच्या समस्यांचे निराकरण होत होते. तर काही तक्रारी समस्यांचा आवश्यक असणारे कर्मचारी सुटीवर अथवा दुसऱ्या शिफ्टमध्ये टाकल्याने पुन्हा येण्याबाबत सांगण्यात येत होते.

पोलिसांच्या हजेरीचे ॲप बंद

सध्या अत्याधुनिक झालेले पोलिस ठाणे मात्र कर्मचाऱ्यांच्या हजेरीबाबत मात्र जुनेच आहे. अजूनही हजेरी पुस्तकावर सही करून हजेरी मांडली जात आहे. पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्ला असताना ‘एम पोलिस’ या ॲपचा वापर होत होता. तो नंतर बंद झाला आणि आठ तासांच्या ड्यूटीचे स्वप्न हे कर्मचाऱ्यांसाठी स्वप्नच राहिले आहे. रात्रपाळी करून गेलेल्या अधिकाऱ्याला सकाळी परत कामावर यावे लागते.

आकडेवारी

एकूण १४२ कर्मचारी असणाऱ्या या पोलिस ठाण्यामध्ये ८८ पुरुष कर्मचारी आहेत तर ६६ महिला कर्मचारी आणि आठ अधिकारी आहेत.

 

Web Title: hadapsar police station pune Although the police station is open 24 hours, work is done according to the convenience of the employees.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.