हडपसर, वानवडी परिसरात वाहनचोरीचे गुन्हे अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:11 AM2021-09-22T04:11:17+5:302021-09-22T04:11:17+5:30
स्टार १२०९ लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहर वेगाने वाढत आहे. शहरातील उपनगरांमध्ये रोज नव्या इमारती व वसाहती ...
स्टार १२०९
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहर वेगाने वाढत आहे. शहरातील उपनगरांमध्ये रोज नव्या इमारती व वसाहती उभारल्या जात आहे. त्यातून उपनगरांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. वाहनचोरीचे प्रमाणही मध्य वस्तीपेक्षा नव्याने विकसित झालेल्या उपनगरांमध्ये अधिक असल्याचे दिसून येत आहे. पुणे पोलीस दलाच्या परिमंडळ ५ च्या अंतर्गत येत असलेल्या हडपसर, वानवडी, लोणी काळभोर, मुंढवा, बिबवेवाडी, मार्केट यार्ड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक वाहनचोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत.
वाहनचोरीचे शहरातील प्रमाण मोठे आहे. गेल्या अडीच वर्षांत तब्बल ४२ कोटी ४२ लाख ३७ हजार रुपयांची ७ हजार ४६० वाहनांची चोरी झाली आहे. त्यापैकी केवळ १५ कोटी ५४ लाख ३० हजार रुपयांच्या २ हजार २७२ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले होते. मालमत्ता हस्तगत करण्याचे प्रमाण ३६ टक्के इतके आहे. वाहनचोरी रोखण्यासाठी शहर पोलीस दलात वाहनचोरी विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
शहरातील मध्यवस्तीतील परिमंडळ १ मध्ये प्रामुख्याने पेठांचा परिसर येतो, या ठिकाणी वाहनचोरीसह इतर गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे. या मध्यवस्ती लगतचा भाग तसेच भारती विद्यापीठापासून स्वारगेटपर्यंतचा भाग परिमंडळ २ मध्ये येतो. तेथेही त्या मानाने वाहनचोरीचे गुन्हे कमी आहेत.
कोथरूड, सिहंगड रोड, वारजे, उत्तमनगर, दत्तवाडी परिसर परिमंडळ ३ च्या अंतर्गत येतो. या परिमंडळातही उपनगरांचा मोठा भाग आहे. येथील वाहनचोरीचे प्रमाण थोडे अधिक आहे.
परिमंडळ ४ मधील येरवडा, विमानतळ, चतु:शृंगी, खडकी, विश्रांतवाडी, चंदननगर, नगर रोड या परिसरात वाहनचोरीचे प्रमाण अधिक आढळून येते.
या वर्षी १ जानेवारी ते १७ सप्टेंबर दरम्यान शहरात १०२० वाहनचोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यातील निम्म्याहून अधिक ५३६ वाहनचोरीचे गुन्हे परिमंडळ ४ व ५ च्या हद्दीत घडले आहेत.
शहरातील वाहनचोरीचे गुन्हे
परिमंडळ १ - १११
परिमंडळ २ - १५५
परिमंडळ ३ - १८८
परिमंडळ ४ - २२७
परिमंडळ ५ - ३३९
........