वारीच्या मुक्कामांचे ‘हगणदरीमुक्त’ मॉडेल

By admin | Published: July 19, 2015 03:48 AM2015-07-19T03:48:21+5:302015-07-19T03:48:21+5:30

संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी हगणदरीमुक्त मॉडेलचा उपक्रम सेवा सहयोग फाउंडेशनने राबविला आहे. पुणे ते पंढरपूर मार्गावरील यवत

'Hagderree-free' model of Varan's stay | वारीच्या मुक्कामांचे ‘हगणदरीमुक्त’ मॉडेल

वारीच्या मुक्कामांचे ‘हगणदरीमुक्त’ मॉडेल

Next

- हणमंत पाटील,  पुणे
संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी हगणदरीमुक्त मॉडेलचा उपक्रम सेवा सहयोग फाउंडेशनने राबविला आहे. पुणे ते पंढरपूर मार्गावरील यवत व लोणी येथील मुक्कामाच्या ठिकाणी पोर्टेबल स्वच्छतागृहे उभारून दोन्ही गावे हगणदरीमुक्त करण्यात आली आहेत.
पुणे शहरात संत तुकाराममहाराज यांच्या पालख्यांचे जंगी स्वागत दर वर्षी केले जाते. शहरातील मुक्कामा वेळी महापालिकेकडून वारकऱ्यांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा देण्यात येते. मात्र, गावांतील मुक्कामा वेळी उघड्यावर शौचास जाण्याचे प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर, तुकाराममहाराज पालखीमध्ये जनजागृती करून मुक्कामाची गावे हगणदरीमुक्त करण्याचा पथदर्शी प्रयोग राबविण्यासाठी पुण्यातील सेवा सहयोग फाउंडेशनने पुढाकार घेतला. हा पहिला प्रकल्प राबविण्यासाठी यवत व लोणी गावांची निवड केली. त्यानुसार लोकवर्गणीतून दोन्ही गावांत सुमारे ४०० पोर्टेबल स्वच्छतागृहे उभारण्यात आली.
शहरातील ‘आयटी’ व खासगी कंपन्यांतील तरुणांनी या उपक्रमांत भाग घेतला. दोन्ही पालख्या यवत व लोणी या ठिकाणी मुक्कामाला येण्यापूर्वीपासून ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, ग्रामसेवक व स्थानिक नागरिकांच्या लोकसहभागातून सेवा फाउंडेशनने वारकऱ्यांमध्ये जनजागृती केली. त्यामुळे मुक्कामाच्या दिवशी दोन्ही गावे हगणदारीमुक्त ठेवण्याचा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाला. या अभियानाचे संयोजन माजी खासदार प्रदीप रावत यांनी केले.
रावत म्हणाले, ‘‘यवत व लोणी गावांत सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून पथके नियुक्त केली होती. त्यामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शैैलेश घाटपांडे, निनाद संस्थेचे उदय जोशी, शिवाजी मोरे, अतुल लिमये, संदीप जाधव, मारुती तुपे, नंदकिशोर काळभोर, संतोष दाभाडे, बाळासाहेब आमराळे, धनंजय वाडेकर यांनी स्वयंसेवकांच्या पथकांची जबाबदारी पार पाडली. लोकवर्गणी व लोकसहभागातून हा प्रयोग करण्यात आल्याने साधारण एका गावात ४ लाख रुपये खर्च झाला आहे. दोन्ही पालख्यांची सुमारे ४० मुक्कामाची ठिकाणे आहेत. सर्व ठिकाणी हे मॉडेल राबविल्यास साधारण दीड ते दोन कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे आग्रह धरणार आहे.’’

संत तुकाराममहाराजांच्या पालखीचे दर वर्षी लोणीचे ग्रामस्थ आनंदाने स्वागत करून अन्नदान करतात. परंतु, स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने परिसरात वारीनंतर दुर्गंधी निर्माण होते. या वर्षी वारीचा मुक्काम हगणदरीमुक्त करण्याचा प्रयोग लोकसहभागामुळे यशस्वी झाला.
- नंदकिशोर काळभोर,
ग्रामस्थ, लोणी.

Web Title: 'Hagderree-free' model of Varan's stay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.