अवकाळी हजेरीने तारांबळ

By admin | Published: May 24, 2017 03:58 AM2017-05-24T03:58:59+5:302017-05-24T03:58:59+5:30

मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या उकाड्यामुळे आज सायंकाळी ५.३० ते ६ वाजेपर्यंत सुमारे अर्धातास गारांसह पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे

Hail | अवकाळी हजेरीने तारांबळ

अवकाळी हजेरीने तारांबळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या उकाड्यामुळे आज सायंकाळी ५.३० ते ६ वाजेपर्यंत सुमारे अर्धातास गारांसह पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र अचानक झालेल्या पावसामुळे भोरच्या मंगळवारच्या बाजारातील भाजीपाला, कडधान्य, कापड व्यापऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. माल भिजल्याने मोठे नुकसान झाले.
भोर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी भोरच्या बाजारात पावसामुळे सर्वांचीच चांगलीच तारांबळ उडाली आहे. मात्र पाऊस सुरू होण्याआधीच शहरासह ग्रामीण भागातील वीज गायब झाली असून दररोज कोणतीही पूर्वकल्पना न देताच वारंवार वीजपुरवठा खंडित केला जातो. भाटघर पॉवर हाऊसवरुन वीज गेल्याचे वीज वितरण कंपनीकडून सांगितले जाते, तर पॉवर हाउसकडून आम्ही वीजपुरवठा खंडीत करित नसल्याचे सांगतात. एकमेकांवर ढकलून मोकळे होतात. मात्र दोघांच्यात सर्वसामांन्य नागरिकांचे हाल होताहेत. मागील दोन महिन्यांपासून विजेचा खेळखंडोबा
सुरू आहे.
दरम्यान वीसगाव खोऱ्यातील पळसोशी गावातील ट्रान्सफॉर्मर खराब झाला होता. त्याची दुरुस्ती वीज वितरण कंपनीकडून करण्यात आली. मात्र गावात पूर्वकल्पना न देताच वीजपुरवठा अचानक सुरू केल्याने पळसोशी गावातील टीव्ही, फ्रिज, ट्युबलाईट, बल्ब गेल्याने संपूर्ण गावाचे मिळून सुमारे ७ ते ८ लाखांचे नुकसान झाल्याचे गावातील
शेतकरी हनुमंत म्हस्के व लक्ष्मण
म्हस्के यांनी सांगितले. वीज वितरण कंपनीने गावातील लोकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

ओझर : जुन्नर तालुक्यातील ओझर आणि परिसरातील गावांमधे जोरदार वादळी वाऱ्यासह मॉन्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसाने शेती पिकांना जीवनदान मिळाले, तालुक्यात लग्नतिथ मोठी असल्याने या अचानक आलेल्या पावसामुळे वऱ्हाडी मंडळींची चांगलीच धांदल उडाली. काही मंडळींना तर जवळच्या नातेवाइकांच्या लग्नालादेखील उपस्थित राहता आले नाही.
ओझर येथे तर विवाह सोहळ्याला उपस्थितीत असलेल्या लोकांच्या शेतामधे पार्किंग केलेली वाहने चिखलामुळे कसरत करून रस्त्यावर आणावी लागली. ओझर परिसरातील शिरोली बुद्रुक, तेजेवाडी, हिवरे बुद्रुक, धालेवाडी या परिसरात सुमारे अर्धा तास पाऊस पडत होता.
वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी छोटी झाडे व इलेक्ट्रिक पोल पडले. ओझर आणि धालेवाडी येथे तुरळक ठिकाणी लहान आकाराच्या गारादेखील पडल्या. या पावसामुळे पाण्याअभावी जळून चाललेल्या पिकांना जीवदान मिळाले. दुपारी चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान पावसाने काही गावांमधे वीस मिनीट, तर काही ठिकाणी अर्ध्यातासापेक्षा अधिक वेळ पाऊस पडला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन कडक उष्णतेमुळे हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाला.

वीजबंदचे शॉक सुरूच
वीज वितरण कंपनीकडून मान्सूनपूर्व कामाची सुरुवात दोन महिन्यांपूर्वीच करून विजेच्या खांबाला लागणारी झाडेझुडपे तोडणे, लोंबकळणाऱ्या तारा ओढणे, वाकलेले खांब सरळ करणे अशा प्रकारची कामे करणे गरजेचे होते.
मात्र वीज वितरण कंपनीकडून मागील आठवडाभरापासून दररोज दोन तास तर दर गुरुवारी दिवसभर वीजपुरवठा खंडित करून दुरुस्तीची कामे सुरू आहेत. यामुळे वीजपुरवठा वारंवार गायब होत आहे.

चाकण झाले चिंब
आसखेड : असह्य उकाड्याने हैराण झालेल्या चाकणकरांना परिसरात मंगळवारी दुपारी झालेल्या पावसामुळे हवेत आल्हाददायक गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला. चाकणला वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची भंबेरी उडाली. पावसाचे थेंब मोठमोठे असल्याने काही वेळातच सर्वत्र पाणी पाणी झाले . सुमारे पाऊण तास पाऊस सुरू होता.
चाकण परिसरात हा पहिलाच मॉन्सूनपूर्व पाऊस असल्याने अनेकांनी भिजण्याचा आनंद घेतला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे थोडे नुकसान झाले. वादळी पावसामुळे कैऱ्यांचा ढीग साचला होता. पहिलाच पाऊस असल्याने खड्ड्यांत पाणी साचले.

शेतकऱ्यांची कांदा झाकण्यासाठी धावपळ
घोडेगाव : घोडेगाव व परिसरात सायंकाळी पावसाचा शिडकाव झाला. सकाळपासून गरम वातावरण असताना सायंकाळी अचानक ढग दाटून आले व पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तास पाऊस पडल्यानंतर आकाशात बराच वेळ विजांचा कडकडाट सुरू होता.
पावसामुळे वातावरणात थोडा गारवा निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांची धावपळ करून टाकली. शेतात पडलेला कांदा झाकण्यासाठी शेतकरी पळापळ करत होते, तर झाडावर तयार झालेल्या कैऱ्या या पावसामुळे गळून गेल्या.

Web Title: Hail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.