‘वंदे मातरम्’चा जयघोष अन् मानवंदना
By admin | Published: January 25, 2017 02:27 AM2017-01-25T02:27:54+5:302017-01-25T02:27:54+5:30
‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’चा जयघोष, ‘कुणाल गोसावी अमर रहे’ अशा घोषणांनी मॉडर्न महाविद्यालयाचा परिसर दुमदुमून गेला
पुणे : ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’चा जयघोष, ‘कुणाल गोसावी अमर रहे’ अशा घोषणांनी मॉडर्न महाविद्यालयाचा परिसर दुमदुमून गेला. सीमेवरील जवानांच्या शौर्याचे चित्तथरारक प्रसंग ऐकताना तरुणाईच्या अंगावर रोमांच उभे राहिले. पंढरपूर येथील शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, मॉडर्न कॉलेज आॅफ आटर््स, सायन्स अँड कॉमर्स आणि सैनिक मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे वडील मुन्नागीर गोसावी, आई वृंदा गोसावी, बहीण रुपाली गोसावी यांचा उपरणे, श्रीफल आणि मानचिन्हे देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सदस्य नंदकिशोर एकबोटे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य मिलिंद वाघमारे, शाहीर हेमंतराजे मावळे, सैनिक मित्र परिवारचे आनंद सराफ उपस्थित होते.
मुन्नागीर गोसावी म्हणाले, ‘‘सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना पैशाची भूक नसते. तर, सैनिकांनी केलेल्या कृतज्ञतेची जाण सामान्यांना असावी इतकीच अपेक्षा असते. सध्या देशप्रेमाचे वातावरण कमी होत आहे. देशभक्ती आणि संरक्षण हा मोठा विषय आहे. त्यामुळे प्रत्येक सामान्य नागरिकाचे त्यात योगदान असणे गरजेचे आहे.’’
प्रा. निकेतन शेठ यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. मिलिंद वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संगीता मावळे यांनी आभार मानले.