सकाळी गारठा, दुपारी उन्हाचा चटका! येत्या ४-५ दिवसांमध्ये फारसा बदल होणार नाही
By श्रीकिशन काळे | Published: February 12, 2024 07:37 PM2024-02-12T19:37:30+5:302024-02-12T19:40:42+5:30
विदर्भामध्ये मात्र पुढील २४ तासांत पावसाचा अंदाज देण्यात आला आहे
पुणे: सध्या किमान व कमाल तापमानात चढ-उतार जाणवत आहे. सकाळी थंडीचा गारठा आणि दुपारी मात्र उन्हाचा कडाका आहे. येत्या चार-पाच दिवसांमध्ये मात्र किमान तापमानात फारसा बदल होणार नाही, असे हवामान विभागाने सांगितले आहे. विदर्भामध्ये मात्र पुढील २४ तासांत पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
देशात वाऱ्याची चक्रीय स्थिती दक्षिण गुजरात, मराठवाडा, विदर्भावर आहे. हिमालयावर नवीन वाऱ्याचा प्रकोप १४ फेब्रुवारीपासून येण्याचा अंदाज आहे. तसेच विदर्भात पुढील २४ तासांत मेघगर्जनेसह अतिहलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. पुणे व परिसरात ४८ तासांत आकाश ढगाळ राहील. पहाटे हलके धुके पडेल. पुढील चार-पाच दिवसांमध्ये किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. राज्यात कमाल तापमान परभणीला ३५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले, तर किमान तापमान नगरला १२.३ नोंदविण्यात आले आहे. पुण्यामध्ये किमान तापमान १३.१ होते तर कमाल तापमान ३३.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
विदर्भातील तीन दिवसाच्या पावसाळी वातावरण मावळल्यानंतर मंगळवार दि.१३ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील थंडी कायमचीच गायब होवून ह्या वर्षीच्या हिवाळी हंगामाच्या थंडीची सांगता झाली, असेच समजावे. मंगळवारनंतर थंडी जाऊन तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. - माणिकराव खुळे, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ
पुण्यात तापमानात चढ-उतार
शहरामध्ये सोमवारी सकाळी हवेली, एनडीएचे किमान तापमान ११ अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यामुळे पुणेकर चांगलेच गारठले होते. शिवाजीनगरला १३.१ तापमान होते. तर दुसरीकडे वडगावशेरीला १९.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. तापमानातील या चढ-उतारामुळे पुणेकरांचे आरोग्यावर परिणाम होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
राज्यातील किमान व कमाल तापमान
पुणे : १३.१ : ३३.६
नगर : १२.३ : ३३.०
महाबळेश्वर :२८.८ : १५.७
नाशिक : ३१.४ : १२.७
मुंबई : २९.७ : १९.८
परभणी : ३५.९ : १८.३
नागपूर : ३०.० : १९.४