घरकामांच्या वाटणीने झाली ‘दिलजमाई’
By admin | Published: January 30, 2015 03:44 AM2015-01-30T03:44:14+5:302015-01-30T03:44:14+5:30
उच्चभ्रू दुनियेत दोघांचाही करिअर ग्राफ उंचावत चालला होता; पण वैवाहिक जीवनामध्ये मात्र दुरावा निर्माण होत गेला. रोजची कुरकुर, भांडणाला वैतागून ‘त्या’ दोघांनी थेट न्यायालयाचेच दार ठोठावले
पुणे : उच्चभ्रू दुनियेत दोघांचाही करिअर ग्राफ उंचावत चालला होता; पण वैवाहिक जीवनामध्ये मात्र दुरावा निर्माण होत गेला. रोजची कुरकुर, भांडणाला वैतागून ‘त्या’ दोघांनी थेट न्यायालयाचेच दार ठोठावले. सारे काही चुटकीसरशी हवे असणाऱ्या जमान्यातील या दोघांनाही तत्काळ फारकत हवी होती. ‘घरकामाची वाटणी’ या किरकोळ कारणाचा साक्षात्कार त्यांना न्यायालयाच्या आवारात झाला. वकिलाच्या शोधार्थ आलेले दोघे वकिलाशिवायच एकत्र नांदायला परतले. हे घडले ते दाखलपूर्व समुपदेशनाने !!
सरिता व राजेश (नावे बदललेली) दोघांचाही नुकताच विवाह झाला होता. सरिताने घटस्फोटाचे निश्चित केलेले होते व त्यासाठी वकील शोधण्यास ती न्यायालयात आली. तेथे ती चौकशीसाठी पुणे जिल्हा विधी सेवा समितीचे सचिव महेश जाधव यांच्याकडे गेली.
जाधव यांनी तिचे म्हणणे ऐकून घेतले त्यानंतर त्यांनी तिचे समुपदेशन केले. त्यातून राजेशने घरकामात मदत करावी, इतकीच तिची अपेक्षा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी राजेशलाही बोलावून घेतले. त्याचेही वैयक्तिक म्हणणे ऐकून घेतले. भांडणाचे कारण किरकोळ असल्याचे लक्षात आल्यानंतर दोघांनाही एकत्रित बसवून त्यांच्या चुका आणि अपेक्षा एकमेकांना सांगण्यात आल्या. घडल्या प्रकारातून दोघांनाही त्यांच्या चुका उमगल्या होत्या व किरकोळ कारणाचे संवादातून उत्तर शोधता येईल, हेही त्यांच्या लक्षात आले. वकिलाचा शोध पूर्ण झाला नाही; मात्र तरीही त्यांचा संसार पुन्हा नव्याने जुळला आणि दोघेही न्यायालयात प्रवेश न करता न्यायालयाच्या आवारातूनच आनंदाचे सहजीवन जगण्यास माघारी परतले. (प्रतिनिधी)