कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पानटपरी, हेअर सलून राहणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 01:44 PM2020-03-18T13:44:22+5:302020-03-18T13:46:34+5:30
कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन
पुणे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पुणे व्यापारी महासंघाच्या तीन दिवस व्यापार बंदमध्ये पुणे पान व्यापारी महासंघासह व नाभिक संघटनांनी देखील सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे दि. १८ ते २० मार्च असे तीन दिवस पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सर्व पानाची दुकाने व हेअर सलून बंद ठेवण्यात येणार आहे.
‘थुंकीचे पाट आता बास’ या ‘लोकमत’ने सुरू केलेल्या मोहिमेमध्ये असोसिएशनने उत्स्फूूर्तपणे सहभाग घेतला आहे. त्यानुसार पान दुकानाच्या परिसरात स्वच्छता ठेवण्याबरोबरच ग्राहकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येत आहे. ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त अनेक विक्रेत्यांनी त्यांच्या दुकानावर लावले आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन ते करत आहेत. याच मोहिमेचा भाग म्हणून त्यांनी पुढील तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे व्यापारी महासंघानेही ३ दिवस व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महासंघाच्या पदाधिकाºयांनी स्वत: लोकमत कार्यालयात येऊन ही माहिती दिली. यापार्श्वभूमीवर संघटनेनेही सामाजिक भान जपत नुकसानीचा विचार न करता यामध्ये सहभाग घेतला आहे. तसेच पुण्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने होत असलेली वाढ लक्षात घेता पुण्यातील नाभिक संघटनांनी देखील पुढील काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीच्या दृष्टीने हा निर्णय घेत असल्याचे नाभिक महासंघटनांनी जाहीर केले आहे.
.........
संघटनेचे अध्यक्ष शरद मोरे, कार्याध्यक्ष राजाभाऊ परदेशी, खजिनदार प्रवीण तकते, पप्पू सिंग, उपाध्यक्ष कमलेश सिंग, सदस्य झुबेर तांबोळी, सुनील खडके, भोजा पुजारी आदींच्या उपस्थित झालेल्या बैठकीमध्ये बंदचा निर्णय घेण्यात आला. पुणे व्यापारी महासंघाने बंदचा कालावधी वाढविल्यास पानविक्रेतेही दुकाने बंद ठेवतील. कोणत्याही विक्रेत्यावर त्यासाठी जबरदस्ती केली जाणार नाही. त्यांनी स्वच्छेने दुकाने बंद ठेवून यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन मोरे यांनी केले आहे.