२५ हजार डॉलर्सची महिला टेनिस स्पर्धा पुण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:11 AM2021-03-05T04:11:40+5:302021-03-05T04:11:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पंचवीस हजार डॉलर पारितोषिक रकमेच्या केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धा येत्या ७ ते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पंचवीस हजार डॉलर पारितोषिक रकमेच्या केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धा येत्या ७ ते १४ मार्चदरम्यान पुण्यात होत आहे. लॉकडाऊननंतर अशा प्रकारची आयटीएफ स्पर्धा आयोजित करणारे पुणे हे आशियातील पहिलेच शहर ठरणार आहे.
या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) आणि पीएमडीटीए यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी सांगितले की, अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए) व भारतीय क्रीडा प्राधिकरण(स्पोर्ट्स अथोरिटी ऑफ इंडिया) यांनी भारतात आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा आग्रह धरला. तेव्हा आम्ही पुण्यात व महाराष्ट्रात पुरुष व महिलांची एक टेनिस स्पर्धा व्हावी असा आग्रह धरला. या स्पर्धांच्या संयोजनाचा मान आम्हाला मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे. एमएसएलटीए व डेक्कन जिमखाना यांनी या दोन्ही प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्याचे मान्य केले आहे.
या स्पर्धेच्या मुख्य ड्रॉ मध्ये दहा आणि पात्रता फेरीत पस्तीस अशा एकूण ४५ भारतीय महिला खेळाडूंना या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाल्याचे किशोर पाटील यांनी नमूद केले. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे मानद सचिव आणि स्पर्धेचे संचालक सुंदर अय्यर म्हणाले की, या स्पर्धेतील सर्व सामने प्रेक्षकांशिवाय खेळविले जाणार आहेत. स्पर्धेतील सामन्यांचे लाईव्ह स्कोरिंग आयटीएफच्या संकेतस्थळावर, आयटीएफच्या ऍपवर उपलब्ध असेल.
स्पर्धेच्या संयोजन समितीत स्पर्धेचे सहसंचालक आश्विन गिरमे, विश्वास लोकरे, शेखर सोनसळे, अभिषेक ताम्हाणे, कौस्तुभ शहा, हिमांशू गोसावी, जयंत कढे यांचा समावेश आहे. स्पर्धेसाठी गोल्ड बॅच रेफ्री शीतल अय्यर यांची आयटीएफ सुपरवायझर म्हणून निवड करण्यात आली आहे.
चौकट
अशी होईल स्पर्धा
पात्रता फेरी - ७ व ८ मार्च
मुख्य फेरी - ९ मार्चपासून.
दुहेरी अंतिम सामना - १३ मार्च
एकेरी गटाचा अंतिम सामना - १४ मार्च
चौकट
स्पर्धेचे आकर्षण
जर्मनीची जागतिक क्रमवारीत २४९ व्या स्थानी असलेली कॅथरीना गैरलाच, मॅसीडोनियाची (जागतिक क्रमांक ३५०) लीना जोर्चेस्का, हंगेरीची पन्ना उदवार्दी (जागतिक क्र. ३५२), रोमानियाची मिरीयम बियांका बुलगरू (जागतिक क्रमांक ३८०), जॉर्जियाची सोफिया शपताव्हा (जागतिक क्रमांक ३८४), युक्रेनची मारियाना झकारल्युक (जागतिक क्रमांक ४९०) यासारख्या पंधरा देशातील मानांकित खेळाडू पुण्यात कौशल्य पणाला लावतील.
चौकट
भारतीय महिला खेळाडूंमध्ये रिया भाटिया (जागतिक क्रमांक ३५३), ऋतुजा भोसले (जागतिक क्रमांक ४३१), झील देसाई (जागतिक क्रमांक ६३६), सौजन्या बाविशेट्टी (जागतिक क्रमांक ६४१), सात्विका समा (जागतिक क्रमांक ८५९), मिहिका यादव (जागतिक क्रमांक ९०७), जेनिफर लुईखेम (जागतिक क्रमांक ९४८) यांना थेट मुख्य मध्ये प्रवेश मिळाला असून आणखी चार भारतीय खेळाडूंना वाईल्ड कार्डद्वारे देण्यात येणार आहे.