पिण्याच्या पाण्यासाठी हेलपाटे
By admin | Published: November 26, 2015 12:57 AM2015-11-26T00:57:51+5:302015-11-26T00:57:51+5:30
दोन वर्षांपूर्वी बारामती नगरपालिकेच्या हद्दवाढीत समावेश झालेल्या शेंडेवस्ती येथील रहिवासी अद्याप मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.
बारामती : दोन वर्षांपूर्वी बारामती नगरपालिकेच्या हद्दवाढीत समावेश झालेल्या शेंडेवस्ती येथील रहिवासी अद्याप मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. येथील रहिवाशांनी पाणी आणि रस्त्यांसाठी वारंवार नगरपालिकेला निवेदने दिली; मात्र त्याची अद्याप दखल घेण्यात आली नाही.
रस्ते, पिण्याचे पाणी, वीज, कचरा अशा विविध समस्यांचा सामना येथील नागरिक करीत आहेत. नगरपालिकेने येथील ड्रेनेज लाइनच्या कामाला सुरुवात केली होती. मात्र, येथील एका जागामालकाच्या अडवणुकीमुळे चार महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे रस्त्याच्या वर दोन फूट ड्रेनेज लाइन वर आल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच, येथील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रतिभानगर, हरिकृपानगर, प्रशासकीय भवनाचा परिसर आदी ठिकाणी हेलपाटे मारावे लागतात. दोन वर्षांपासून नगरपालिकेत येऊनदेखील पिण्याचे पाणी मिळाले नसल्याने येथील नागरिक संतप्त झाले आहेत. शेंडेवस्तीच्या जवळच शहराला भूमिगत वीजपुरवठा करणारे सबस्टेशन आहे, परंतु अद्याप शेंडेवस्तीला वीज मिळालेली नाही. त्यामुळे दररोज आठ तास भारनियमाचा येथील नागरिकांना सामना करावा लागत आहे. सध्या या परिसरात बारामती हॉस्पिटलचे काम प्रगतिपथावर आहे. प्रशासकीय भवनालगतच्या बाह्यवळण रस्त्यापासून बारामती हॉस्पिटलपर्यंत आलेला रस्ता थेट शेंडेवस्तीपर्यंत आणल्यास येथील नागरिकांची रस्त्याची समस्या सुटण्यास मदत होईल, आशी मागणीदेखील येथील नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना केली आहे. बारामती नगरपालिकेच्या हद्दवाढ क्षेत्रातील तांदूळवाडी, जळोची (सूर्यनगरी) येथील अंतर्गत रस्ते आणि विविध मूलभूत सुविधांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे शेंडेवस्ती येथील नागरिकांना ‘आमचा नंबर केव्हा’ असा प्रश्न पडला आहे. (प्रतिनिधी)
रस्त्यासाठी नागरिकांच्या खिशाला भुर्दंड
- शेंडेवस्ती येथील रहिवाशांनी स्वत:हून ९० हजार रुपये खर्च करून रस्त्यावर मुरूम टाकला. दोन वर्षांपासून आम्ही घरपट्टी भरत आहोत. नगरपालिकेत येऊनदेखील मूलभूत सुविधांसाठी आम्हाला आमच्या खिशातील पैसा खर्च करावा लागत आहे. तक्रारी केल्या तर कोणी दाद देत नाही, अशी व्यथा येथील नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना
व्यक्त केली.