१० महिन्यांत वाढले सव्वा लाख मतदार; प्रारुप मतदार यादी जाहीर
By नितीन चौधरी | Published: October 27, 2023 06:59 PM2023-10-27T18:59:22+5:302023-10-27T18:59:29+5:30
प्रारूप मतदार यादीत एकूण मतदार संख्या ८० लाख ७३ हजार १८३ इतकी
पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार राज्याची प्रारुप मतदार यादी जाहीर झाली असून जिल्ह्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार गेल्या १० महिन्यांमध्ये १ लाख २१ हजार ७६३ इतक्या मतदारांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात ५ जानेवारी २०२३ च्या अंतिम मतदार यादीमध्ये एकूण मतदार संख्या ७९ लाख ५१ हजार ४२० तर तर शुक्रवारी (दि. २७) प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत एकूण मतदार संख्या ८० लाख ७३ हजार १८३ इतकी आहे. मात्र, तरुणांची नोंदणी कमी असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय प्रारूप मतदार यादी शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली. नागरिकांनी ९ डिसेंबरपर्यंत मतदार यादी संदर्भातील दावे व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
या यादीनुसार जिल्ह्यात पुरुष मतदारांची संख्या जानेवारीमधील ४१ लाख ६६ हजार २६५ च्या तुलनेत ४२ लाख २५ हजार ९१८ इतकी आहे. यात ५९ हजार ६५३ ने वाढ झाली आहे. तर जानेवारीमध्ये स्त्री मतदारांची संख्या ३७ लाख ८४ हजार ६६० इतकी तर ऑक्टोबरमध्ये हीच संख्या ३८ लाख ४६ हजार ७४१ इतकी आहे. यातही ६२ हजार ८१ मतदारांची वाढ झाली आहे. जानेवारीच्या मतदार यादीमध्ये १ हजार पुरुषांच्या मागे ९०८ तर ऑक्टोबरमध्ये १ हजार पुरुषांमागे ९१० स्त्री मतदार आहेत. तृतीयपंथी समुदायाच्या संख्येत ४९५ वरुन ५२४ इतकी वाढ झाली आहे.
जिल्ह्याच्या १८ ते १९ वयोगटाची लोकसंख्या ३.१३ टक्के अर्थात ३ लाख ७१ हजार ३ आहे परंतु ऑक्टोबरच्या यादीनुसार यापैकी केवळ ०.६७ टक्के म्हणजेच ७९ हजार ३६२ युवकांची मतदार नोंदणी झाली आहे. २० ते २९ वयोगटाची लोकसंख्या २३.८६ टक्के अर्थात २८ लाख २७ हजार ३७६ इतकी आहे. मात्र, ऑक्टोबरच्या यादीनुसार यापैकी केवळ ११.५१ टक्के म्हणजेच १३ लाख ६३ हजार ६२४ मतदार नोंदणी झाली आहे.
या वेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी सीमा होळकर, कसबा विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, तहसीलदार राधिका हावळ बारटक्के, उज्ज्वला सोरटे, शीतल मुळे, नायब तहसीलदार सीताकांत शिर्के, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्राप्त दावे व हरकतीवर २६ डिसेंबर २०२३ पर्यंत निर्णय घेण्यात येणार असून ५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारुप मतदार यादी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर, मतदार नोंदणी अधिकारी तसेच मतदान केंद्राच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली.