अर्धा तास गाडीचे चाक पोटावरच; युवकाचा तडफडून मृत्यू, निर्दयी PMPML चा ढिसाळपणा समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 01:32 PM2024-06-23T13:32:45+5:302024-06-23T13:33:15+5:30

बसचालकाने आळशीपणा आणि बेशिस्तपणा करीत नियमांचे उल्लंघन केल्याने २१ वर्षीय अपंग तरुणाच्या अंगावर गाडी घातली

Half an hour on the wheel of the car; The death of a youth in the crack, in the face of the ruthless PMPML's laxity | अर्धा तास गाडीचे चाक पोटावरच; युवकाचा तडफडून मृत्यू, निर्दयी PMPML चा ढिसाळपणा समोर

अर्धा तास गाडीचे चाक पोटावरच; युवकाचा तडफडून मृत्यू, निर्दयी PMPML चा ढिसाळपणा समोर

लष्कर : पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे लष्कर भागातील महात्मा गांधी बसस्थानक म्हणजे पुलगेट येथे पीएमपीएमएलच्या बसने जोरात धडक दिल्याने यश कसबेकर (वय २१) याचा मृत्यू झाला होता. या मृत्यूला ड्रायव्हरसह संपूर्ण पीएमपीएमएल व्यवस्थापन जबाबदार असल्याचे दिसून आले. याप्रकरणी बसचालकासह बसस्थानकातील बस वाहतूक नियमनाचे काम करणारे स्टार्टर (स्टेशनमास्तर) कर्मचारी यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लष्कर भागातील विविध नागरिक करत आहेत.

१३ जून रोजी सायंकाळी ९:३०च्या दरम्यान महात्मा गांधी बसस्थानकात पीएमपीएमएल विभागाची वातानुकूलित इलेक्ट्रिक (बस क्र. एमएच १२ टीव्ही ३८१४) चा चालक स्वप्निल काळूराम जगताप (३२, रा. पुरंदर) याने भरधाव वेगाने गाडी चालवत यश विष्णू कसबेकर (वय २१, रा. कोंढवा) याला जोरात धडक दिली. अपघात झाला आहे हे माहीत असतानाही बसचालकाने गाडी मागे घेतली नाही. अर्धा तास गाडीचे चाक मुलाच्या पोटावरच असल्याने त्या युवकाचा अक्षरशः तडफडून मृत्यू झाला. त्यावेळी पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला. मात्र, एवढ्या महत्त्वाच्या स्थानकावर बसचे नियमन करणारे शिट्टी वाजवत बसस्थानकावर उभे राहणारे कर्मचारी आणि बसस्थानकाचे सुरक्षारक्षक हे त्या ठिकाणी नव्हते. ते त्या ठिकाणी असते तर मुलाचा जीव वाचू शकला असता. त्यांच्यावरही गुन्हे दाखल व्हावेत, अशा भावना परिसरातील नागरिकांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली.

याबाबत पुलगेट येथील कर्मचाऱ्यांकडून त्यांची बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माहिती दिली नाही, तर पीएमपीएमएलचे वरिष्ठ अधिकारी दत्तात्रय झेंडे आणि निरंजन तुळपुदे यांना फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही.

वाहनचालकाचा बेशिस्तपणा तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत

पुणे रेल्वेस्थानकाजवळून हडपसरला जाताना मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे पुलगेट बसस्थानकावर चालक स्वप्निल जगताप याने भरधाव वेगात शिरत केवळ १० मीटर अंतरावर टर्न घेतल्याने हा भयंकर अपघात झाला. खरे तर जो कोणी चालक बसस्थानकात बस घेऊन प्रवेश करतो, त्याने जवळपास ३० मीटर अंतर पुढे जात डिझेल पंप आणि चालक रूमवरून टर्न घेत हडपसर थांब्यावर येणे अपेक्षित आहे. परंतु, आळशीपणा आणि बेशिस्तपणा करीत नियमांचे उल्लंघन केल्याने २१ वर्षीय अपंग तरुणाच्या अंगावर गाडी घातली.

पीएमपीएमएल व्यवस्थापनाचे बसस्थानकावर दुर्लक्ष

पुलगेट बसस्थानकावर अस्वच्छ्ता, पिण्याचे पाणी उपलब्ध नसणे, ड्रायव्हर रूम बंद असणे, सतत बंद असलेले अस्वच्छ स्वच्छतागृह यांसह स्टार्टर (स्टेशन मास्तर) स्थानकावर उपलब्ध नसणे, सुरक्षारक्षक उपलब्ध नसणे, अतिक्रमण या समस्या वर्षानुवर्षे पुलगेट बसस्थानकावर आहेत. मात्र, पीएमपीएमएल प्रशासनाचे निरीक्षक, वरिष्ठ अधिकारी हे कधीच या स्थानकावर फिरकतही नाहीत, असे नागरिक प्रवासी सांगतात.

अपघातादरम्यान उपस्थित व्हिडीओ काढण्यात व्यस्त

ज्यावेळी अपघात झाला, त्यावेळी बसचालकाने बस मागे घेतली नाहीच, मात्र अपघातग्रस्त युवकाला रुग्णालयातही घेऊन जायची तत्परतासुद्धा दाखवली नाही. स्थानकावर उपस्थित असलेले नागरिक अपघाताचे चित्रीकरण करण्यात व्यस्त असल्याचे दिसले. जवळपास अर्धा तास अपघातग्रस्त तरुण तडफडत होता आणि शेवटी त्याने जीव सोडला, असे प्रत्यक्षदर्शी एका वृध्द नागरिकाने सांगितले.

आमचा मुलगा गेला, तो केवळ प्रशासनाच्या चुकीमुळेच. याला पीएमपीएमएल प्रशासन जबाबदार आहे. प्रशासनाचे ड्रायव्हर, स्टार्टर, सुरक्षारक्षक या सर्वांवर कठोर कारवाई व्हावी, जेणेकरून इतर दुसऱ्या कोणावर ही वेळ येणार नाही.- पौर्णिमा भोसले (मृत युवकांचे नातेवाइक)

अतिशय गंभीर घटना आहे. आम्ही पीएमपीएमएल प्रशासनाकडे या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी करणार आहोत, मृत युवकाच्या परिवाराला आर्थिक मदत प्रशासनाने केलीच पाहिजे, ही आमची मागणी राहील.- सोमनाथ पानगावे (अध्यक्ष, वंचित युवा आघाडी, पुणे) -

बसचालकांचा हा रोजचा थरार

गेल्या अनेक वर्षांपासून पुलगेट स्थानकात गाडी घेऊन येताना बसचालक हे अतिशय वेगात गाडी घेऊन आत येतात. त्यावर पीएमपीएमएल व्यवस्थापनाचे कुठलेही नियंत्रण नाही आणि आता तर इलेक्ट्रिक बस आल्याने बस येत असल्याचे नागरिकांना जाणवतदेखील नाही. त्यामुळे ही परिस्थिती माहिती असतानाही चालक जाणूनबुजून बसेस स्थानकात सर्रास घेऊन येतात, याकडे पीएमपीएमएल प्रशासन कधीच लक्ष देत नाही.  

Web Title: Half an hour on the wheel of the car; The death of a youth in the crack, in the face of the ruthless PMPML's laxity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.