पुण्याच्या टेकड्यांवरून निम्मे प्राणी लुप्तप्राय; माळरानं कमी झाल्याने अनेकांनी रहिवास बदलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 05:55 PM2020-10-04T17:55:49+5:302020-10-04T20:58:04+5:30
डोंगरांमध्ये येतात आढळून
- श्रीकिशन काळे
पुणे : काही वर्षांपुर्वी शहर आणि परिसरातील टेकड्यांवर सुमारे ६४ हून अधिक प्राणी पहायला मिळत होते. पण आता त्यातील निम्मे लुप्त झाले असून, काहींनी राहण्याचे ठिकाण बदलले आहे. पुर्वी टेकड्या जोडलेल्या होत्या. परिणामी प्राणी ये-जा करायचे. पण आता टेकड्यांची बेटं झाली आणि प्राण्यांना फिरण्यासाठी लागणारा कॉरिडॉरच नष्ट झाला. म्हणून अनेक प्राणी आता दिसून येत नाहीत.
शहरात आणि आजुबाजला अनेक टेकड्या, डोंगर आहेत. त्यामुळे पुर्वी प्राण्यांची विविधताही होती. कालांतराने लोकांची वस्ती वाढली आणि टेकड्यांवरून प्राणी कमी होत गेले. कोल्हा, तरस, खोकड असे मांसाहारी प्राणी आता टेकडीवर दिसत नाहीत. त्यांनी पुण्याबाहेर आपले घर शोधले आहे. या विषयी वन परिक्षेत्र अधिकारी दीपक पवार म्हणाले, टेकड्यांवर आजही ६० हून अधिक प्राणी दिसतात. पण त्यात मासांहारी नाहीत. ते पुण्याबाहेर गेले आहेत. भेकर, ठिपकेवाले हरिण, ससा, कासव, साप, घोरपड, खारूताई असे प्राणी दिसतात.
वन्यजीव संशोधक प्रा. संजीव नलावडे म्हणाले, आम्ही काही वर्षांपूर्वी रानवा संस्थेकडून पुणे परिसरातील प्राण्यांचा सर्व्हे केला होता. तेव्हा ६२ प्राणी दिसले. आता त्यातील निम्मे लुप्त झाले आहेत. कारण ते आता दिसत नाहीत. पुर्वीची किल्ले सिंहगड पासूनची डोंगर रांग होती, ती आता राहिली नाही. प्राण्यांना फिरता येणारा कॉरीडॉरच संपला आहे. टेकड्यांभोवती वस्ती वाढली, हायवे झाले आणि परिणामी प्राण्यांची जागा कमी झाली. अगोदर टेकड्यांवर माळरानं होती. झाडं कमी आणि मोकळी जागा अधिक होती. पण गेल्या काही वर्षात झाडी वाढली आणि कोल्हा, तरस, खोकड कमी झाले. कात्रज, दिवे घाटात अजूनही हे दिसतात. पण शहरातील टेकड्यांवर नाहीत.
‘एनडीए’ परिसरात वाघही होता...
सुमारे १९३० साली एनडीए परिसरात वाघाचे दर्शन झाल्याचे सातारचे तत्कालीन जिल्हाधिकारी थॉमस गे यांनी सांगितले होते. त्यांनी नोंद केली असून, मी देखील त्यांना भेटून याबाबत विचारले होते. तेव्हा त्यांनी वाघ दिसल्याचे सांगितले. कदाचित तो पुणे परिसरातील शेवटचा वाघ असावा, असेही ते म्हणाल्याची आठवण डॉ. संजीव नलावडे यांनी सांगितली. थॉमस हे लॉ कॉलेज रोड परिसरात राहत असत आणि ते उत्तम मराठी बोलायचे.
नष्टप्राय प्राणी
पुण्यातील टेकड्यांवर काळवीट, , हरिण, खवले मांजर, तरस, कोल्हा आदी प्राण्यांची नोंद केलेली आहे. यातले काही क्वचित दिसतात, तर काही लुप्त झाले आहेत.
कुठे काय दिसले ?
नवी पेठेत १९५० मध्ये तरस दिसले होते, तर फर्ग्युसन महाविद्यालयाच्या टेकडीवर १९६० मध्ये चौरंगी हरिण पहायला मिळाले होते. सदाशिव पेठेतील नातूबागमध्ये काळवीट १९४० मध्ये दिसले होते. आता हे सर्व पुणे शहरातून गायबच झाले आहेत. या नोंदी ‘रानवा’ संस्थेने केलेल्या आहेत.