निम्म्या शिक्षण संस्था भ्रष्टाचाराने ग्रस्त आहेत - सत्यपाल सिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:57 AM2018-01-13T00:57:00+5:302018-01-13T00:57:07+5:30
भारत तरुणांचा देश आहे, या तरुणांना दिशा देण्यासाठी दर्जेदार शिक्षक आणि शिक्षणव्यवस्था असली पाहिजे. आज केवळ १० टक्के शिक्षण संस्था उत्कृष्ट कामगिरी करीत असून, ४० टक्क्यांपेक्षा अधिक संस्था भ्रष्टाचाराने ग्रस्त आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांनी केले.
पुणे : भारत तरुणांचा देश आहे, या तरुणांना दिशा देण्यासाठी दर्जेदार शिक्षक आणि शिक्षणव्यवस्था असली पाहिजे. आज केवळ १० टक्के शिक्षण संस्था उत्कृष्ट कामगिरी करीत असून, ४० टक्क्यांपेक्षा अधिक संस्था भ्रष्टाचाराने ग्रस्त आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांनी केले.
एमआयटीच्या वतीने आयोजित दुसºया नॅशनल टीचर्स काँग्रेसच्या समारोपाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सिंग बोलत होते. या वेळी एशियन हेरिटेज फाउंडेशनचे संस्थापक राजीव सेठी, अलका सिंग, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष डी. पी. अगरवाल यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. सिंग म्हणाले, ‘डॉक्टर, इंजिनीअर, शिक्षक, पत्रकार यांसारखी समाजाचे आरोग्य सांभाळणारी माणसे आजकाल आत्महत्या करत आहेत, गुन्हे करत आहेत. हे सगळे पाहिल्यानंतर समाजाचे आरोग्य धोक्यात आल्याचे जाणवते. सृजनशीलता, संशोधन आणि आध्यात्म यांच्या संगमातून चारित्र्यसंपन्न नागरिक घडू शकतो. मेकॉलेने आदर्श भारतीय शिक्षण व्यवस्था मोडकळीस आणली व गुलामगिरी निर्माण करणारी व्यवस्था आणली. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही आपण त्याला सावरू शकलेलो नाही.
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, ‘अनेक देश वैदिक शिक्षणाकडे वळत आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण तत्पर असले पाहिजे. सर्व प्रकारच्या शिक्षकांसाठी एखादी संस्था असली पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.’
उच्च शिक्षित विद्यार्थी शिपाई पदासाठी!
शिपाई पदासाठी पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतलेले उमेदवार अर्ज करीत आहेत, ही बाब चिंतेची आहे. आंतरशाखीय शिक्षणाचा उपयोग करून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करायला हवेत. तशा प्रकारची धोरणे आखली पाहिजेत, असे मत राजीव सेठी यांनी व्यक्त केले.