पुणे मेट्रोसाठी बालेवाडीतील साडेपाच हेक्टर जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 06:41 AM2018-08-01T06:41:18+5:302018-08-01T06:41:31+5:30
हिंजवडी-शिवाजीनगर २३.२ किलोमीटरच्या मेट्रोसाठी बालेवाडी येथे ५ हेक्टर ६० आर जागा देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या जागेचा वाणिज्यिक विकासातून मेट्रोसाठी निधीची उभारणी करण्यात येणार आहे.
पुणे : हिंजवडी-शिवाजीनगर २३.२ किलोमीटरच्या मेट्रोसाठी बालेवाडी येथे ५ हेक्टर ६० आर जागा देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या जागेचा वाणिज्यिक विकासातून मेट्रोसाठी निधीची उभारणी करण्यात येणार आहे. साधारण बाजारमूल्यानुसार १५३ कोटी रुपये या जागेची किंमत आहे. या मेट्रो प्रकल्पातील शासकीय हिस्सा म्हणून राज्य शासन पीएमआरडीएला ही जागा देत आहे, अशी माहिती पुणे महानगर विकास प्राधिकरणचे (पीएमआरडीए) आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची सार्वजनिक-खासगी सहभागाने संकल्पन करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर अंमलबजावणी करण्यात येत आहे. याची बहुतेक कामं पूर्ण व्हायच्या मार्गावर आहेत. ५० एकरांचा भूखंड शेतकऱ्यांशी चर्चा करून डेपो म्हणून घेण्यात येणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. राज्य शासनातर्फे मिळालेला भूखंड पीएमआरडीए विकसित करणार आहे.
पुण्यात आधिच मेट्रोचे दोन ट्रॅक आहेत, त्यांच्या कामांना वेग आला आहे. हिंजवडी हा औद्योगिक परिसर आहे आणि इथे सुमारे दीड दोन लाख लोक खासगी वाहनाने येत असतात. इथे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो असावी, अशी मागणी होती. आज मंत्रीमंडाळाच्या जागेच्या मंजुरीमुळे मेट्रोच्या कामाला गती मिळाली आहे. पुण्यातील वाहतूक नियोजनासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे.
पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी बालेवाडी येथील ५ हेक्टर ६० आर इतकी शासकीय जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे पुणे मेट्रोच्या कामास गती मिळून शहरातील वाहतुकीची समस्या दूर होणार आहे.
- गिरीश बापट, पालकमंत्री