अर्धा जुलै सरला, शहरात नाही पावसाचा पत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:09 AM2021-07-18T04:09:37+5:302021-07-18T04:09:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोकणासह मराठवाडा व विदर्भात पावसाचा जोर असला तरी पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने अजूनही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोकणासह मराठवाडा व विदर्भात पावसाचा जोर असला तरी पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने अजूनही ओढ दिली आहे. पुणे, नाशिक जिल्ह्यांतही अधिकच आहे. अर्धा जुलै सरला असला तरी पुणे शहरात पावसाचा पत्ता नाही. गेल्या १७ दिवसांत शहरात मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे वातावरणातील उकाडा वाढला आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत केवळ २५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवस तरी शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी येतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाचे जोरदार आगमन झाले होते. मात्र, त्यानंतर पावसाने पुणे शहराला हुलकावणी दिली आहे. १७ जूनपर्यंत शहरात ६४.९ मिमी पावसाची नोंद झाली होती. तरी सरासरीपेक्षा २४.८ मिमीने कमी होती. त्यानंतर १९ जून रोजी एका दिवसात ३८.७ मिमी पाऊस झाला होता. त्यानंतर इतका मोठा पाऊस शहरात आतापर्यंत झालेला नाही.
यंदा जुलै महिन्यात आतापर्यंत ५ जुले रोजी १०.१ मिमी पाऊस झाला आहे. त्याच्यापेक्षा एका दिवसात अधिक पाऊस आतापर्यंत झालेला नाही. यापूर्वी जुलै महिन्यात अनेकदा कमी पाऊस झाला आहे. २०१५ या वर्षातील एका दिवसातील सर्वाधिक पाऊस २२ जुलै रोजी १५.१ मिमी पाऊस झाला होता. संपूर्ण जुलै महिन्यात केवळ ६२ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्याचप्रमाणे, ३१ जुलै २०१२ रोजी एका दिवसात १८.२ मिमी हा जुलैतील सर्वाधिक पाऊस होता. मात्र, त्या वर्षी जुलै महिन्यात केवळ ७३.४ मिमी पावसाची नोंद झाली होती.
याचप्रमाणे २०१३ रोजी जुलै महिन्यातील एका दिवसातील सर्वाधिक पाऊस २४ जुलै रोजी ३०.८ मिमी इतका झाला होता. मात्र, जुलै महिन्याभरात थोडा थोडा पाऊस सातत्याने तेव्हा जुलै महिन्यात १९१.७ मिमी पाऊस पडला होता. १४ जुलै २०१७ रोजी २६ मिमी इतका सर्वाधिक पाऊस झाला असला तरी संपूर्ण महिन्यात १९४.२ मिमी पावसाची नोंद झाली होती.
यंदा २० जूनपर्यंत १२६.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. ती सरासरीपेक्षा २५ मिमीने तेव्हा अधिक होती. त्यानंतर मोठा पाऊस झाला नाही. यंदा १७ जुलैपर्यंत पुणे शहरात १७८.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ती सरासरीपेक्षा ७३ मिमीने घटली आहे. पुढील चार दिवसांत शहरात मोठ्या पावसाची शक्यता सध्या तरी दिसून येेत नाही. जुलै महिन्याचे अजून ११ दिवस बाकी आहेत. जर पुढील काही दिवसांत पाऊस झाला नाही तर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा कमी होऊन शहरात पाणी कपातीची वेळ येण्याची भीती आहे.
............
जुलै महिन्यात पश्चिम महाराष्ट्र उणे
हवामान विभागाने जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज वर्तविताना पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहील, असे वर्तविले होते. त्याचा प्रत्यय सध्या येत आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील धरण परिसरात आतापर्यंत पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे.