खंडणीच्या वादातून येरवड्यात जमावाचा प्राणघातक हल्ला, ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 07:37 PM2020-03-07T19:37:14+5:302020-03-07T19:39:45+5:30
कंपनी चालू ठेवायची असेल तर मला एक लाख रुपये हप्ता आणून दे अशी फोनवरून दिली धमकी
पुणे: चुलत भावाच्या लग्नाला बोलावले नाही याचा राग मनात ठेवून खंडणीची मागणी करत जमावाने प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना शुक्रवारी रात्री येरवड्यात घडली. कुंदन सिंग लक्ष्मण सिंग बावरी (वय28 रा. अशोक नगर, येरवडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकरा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमितसिंग जुली (वय 21) खन्नासिंग कल्याणी (वय 42) व निलेश खंडागळे (वय 29 ,तिघेही रा. रामटेकडी, हडपसर, पुणे) यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना नऊ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मण सिंग बावरी यांची खराडी येथे लक्ष्मी फाउंड्री नावाने कंपनी आहे. 24 फेब्रुवारी रोजी खन्ना सिंग कल्याणी याने कुंदन सिंग याला कंपनी चालू ठेवायची असेल तर मला एक लाख रुपये हप्ता आणून दे अशी फोनवरून धमकी दिली होती. यानंतर खन्ना सिंग याने वेळोवेळी फोन करून खंडणी दिली नाही तर जीवे मारून टाकू असे धमकावले देखील होते. 6 मार्च रोजी येरवडा येथे कुंदन सिंग याचा चुलतभाऊ अजित सिंग याचे लग्न होते. या लग्नाला खन्ना सिंग व त्याच्या इतर नातेवाईकांना बोलावले नव्हते. शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कुंदनसिंग अशोकनगर येथील रस्त्यावर उभा असताना खन्नासिंग कल्याणी व त्याचे इतर दहा ते बारा साथीदार तीक्ष्ण हत्यारे घेऊन आले. यावेळी त्यांनी कुंदन सिंग याच्यावर हल्ला केला. कुंदन सिंग जीव वाचवत पळत घराच्या दिशेने गेला. यातील उर्वरित साथीदारांनी घटनास्थळी महिंद्रा पिकअप, पॅगो टेम्पो व बुलेट गाडीचे मोडतोड करून नुकसान केले. याप्रकरणी आरोपींनी गाड्यांची मोडतोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून तीन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित फरारी आरोपींचा येरवडा पोलीस शोध घेत आहेत. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे करीत आहेत.