जागेच्या वादातून चौघांवर तलवारीने खुनी हल्ला, खेड तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 09:29 PM2021-08-18T21:29:28+5:302021-08-18T21:29:59+5:30
चारजण गंभीर जखमी; आरोपींना अटक
शेलपिंपळगाव : सिद्धेगव्हाण (ता.खेड) येथे गायरान जागेच्या वादातून चौघांवर तलवारीने खुनी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले असून दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान चाकण पोलिसांनी हल्लेखोरांना बुधवारी (दि.१८) सकाळी अटक केली आहे.
चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (दि.१७) रात्री दहाच्या सुमारास घडली. सिद्धेगव्हाण येथे गायरान जागेत वास्तव्यास असलेल्या पवार आणि भैरवकर या दोन कुटुंबात जागेच्या हद्दीवरून वाद होता. या वादातून प्रमोद उर्फे नामदेव संजय भैरवकर (वय २७), संजय एकनाथ भैरवकर, जयश्री संजय भैरवकर (सर्व रा.सिद्धेगव्हाण ता.खेड) यांनी मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास पवार कुटुंबातील चार जणांवर धारदार तलवारीने खुनी हल्ला चढवला. या हल्ल्यात चंद्रकांत किसन पवार (वय ४२), प्रतीक चंद्रकांत पवार (वय १८), चैतन्य उर्फ सोन्या चंद्रकांत पवार (वय १६) व कमल चंद्रकांत पवार (वय ३९ सर्व रा. सिद्धेगव्हाण) हे गंभीर जखमी झाले आहेत.
रात्रीच्या सुमारास झालेला आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चार जणांना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी हलविण्यात आले असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान चाकण पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत घटनेचा पंचनामा करून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी प्रमोद उर्फे नामदेव संजय भैरवकर (वय २७), संजय एकनाथ भैरवकर, जयश्री संजय भैरवकर (सर्व रा.सिद्धेगव्हाण ता.खेड) या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित आरोपींना न्यायालयात हजर केले असता पुढील दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा आदेश खेड न्यायालयाने सुनावला आहे. यापुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करत आहेत.