पुण्यातील निम्मी शाळकरी मुलं ‘अनफिट’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 06:00 AM2020-02-11T06:00:00+5:302020-02-11T06:00:08+5:30
विद्यार्थ्यांचे वजन व उंचीच्या प्रमाणात नसून अनेक विद्यार्थ्यांची शारीरिक हालचाल कमी होत असल्याचे स्पष्ट
पुणे : शहरातील विविध शाळांमधील जवळपास निम्मी मुले व मुली शारीरिकदृष्ट्या अनफिट असल्याचे एका सर्वेक्षणामध्ये आढळून आले आहे. या विद्यार्थ्यांचे वजन व उंचीच्या प्रमाणात नसून अनेक विद्यार्थ्यांची शारीरिक हालचाल कमी होत असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. यामध्ये सुमारे २ हजार विद्यार्थ्यांची पाहणी करण्यात आली आहे.
स्पोर्ट्झ व्हिलेज स्कुल या संस्थेतर्फे मागील दहा वर्षांपासून देशभरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांच्या फिटनेसचे सर्वेक्षण केले जात आहे. यावर्षी देशातील २२ राज्यांतील २५० शहरांमधील १ लाख ४९ हजार ८३३ विद्यार्थ्यांची पाहणी करण्यात आली. देशातील ३६४ शाळांमधील ७ ते १७ वर्षे या वयोगटातील विद्याथ्यांच्या बॉडी मास इंडेक्स (बीएमआय)ची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये प्रत्येक दोनपैकी एका मुलाचे वजन उंचीच्या प्रमाणात नसल्याचे आढळून आले. तसेच प्रत्येक तीनपैकी एका मुलाच्या शरीरात पुरेशी लवचिकता नव्हती. तर सहा मुलांमागे एका मुलाच्या उदराच्या स्नायूंमध्ये सुयोग्य ताकद नव्हती. हे प्रमाण पुणे शहरातील विद्यार्थ्यांबाबत आढळले आहे.
संस्थेतर्फे पुण्यातील १ हजार ९४६ विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये १०५९ मुली व ८८७ मुलांचा समावेश होता. या सर्वेक्षणामध्ये ५० टक्के विद्यार्थ्यांचा बीएमआय अनारोग्यदायी असल्याचे दिसून आले. मुली व मुलांचा बीएमआय सारखा आहे. लवचिकतेच्या बाबतीत मुली सरस ठरल्या आहेत. एकुण विद्यार्थ्यांपैकी ७९ टक्के मुली व ६८ मुले लवचिक आढळून आली आहेत. शारिरिक हालचालींच्या क्षमते(एरोबिक)मध्ये एकुण ६४ टक्के विद्यार्थी अनारोग्यदायी आहेत. त्यामध्ये मुलींचे प्रमाण केवळ २२ टक्के एवढे आहे. तर मुलांमध्ये हे प्रमाण दुप्पट दिसून आले. कंबरेच्या वरील भागातील ताकदीमध्ये ५६ टक्के विद्यार्थी अनारोग्यदायी तर पायाच्या ताकदीमध्ये ६६ टक्के विद्यार्थी अनारोग्यदायी आढळले. याविषयी बोलताना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौमिल मजुमदार म्हणाले, मुल शारीरिक हालचालींमध्ये किती वेळ घालवते याचा थेट संबंध शरीराच्या वरच्या भागातील ताकद, बीएमआय आणि एरोबिक क्षमतांशी आहे. त्यासाठी मुलांना खेळण्यासाठी व शिकण्यासाठी समान अवधी मिळायला हवा.
-------------
‘बीएमआय’मुळे मुले कुपोषित आहेत किंवा नाही, त्याचे प्रमाण किती आहे याची माहिती मिळते. पण संबंधित मुले कोणत्या भागातील आहेत, त्यांची कौटूंबिक स्थिती, सामाजिक पार्श्वभुमी, त्यांना मिळणारा आहार यागोष्टी महत्वाच्या असतात. त्यामुळे सर्वेक्षणाचे निष्कर्ष सरसकट सर्व मुलांबाबतीत तेच असू शकतील, असे नाही.
- डॉ. आरती किणीकर, बालरोग विभाग, ससून रुग्णालय