यंदा निम्म्याने टँकर घटले!
By admin | Published: July 18, 2015 04:18 AM2015-07-18T04:18:05+5:302015-07-18T04:18:05+5:30
जलयुक्त शिवार योजनेमधून झालेली कामे, जानेवारीपासून पडत असलेला अवकाळी पाऊस तसेच जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने लावलेली दमदार हजेरी यांमुळे यंदा जिल्ह्यात
पुणे : जलयुक्त शिवार योजनेमधून झालेली कामे, जानेवारीपासून पडत असलेला अवकाळी पाऊस तसेच जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने लावलेली दमदार हजेरी यांमुळे यंदा जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ कमी बसली. या वर्षी टंचाई काळात ४८ टँकर सुरू होते. गेल्या वर्षी टँकरची संख्या ९०च्या घरात गेली होती.
आज (दि. १७ जून) जिल्ह्यात १८ टँकरनी पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या वर्षी ८८ टँकर सुरू होते.
जलयुक्तमधून झालेल्या कामांचा आतापासूनच परिणाम दिसू लागला आहे. जून महिन्यात २२७.९३ मिलिमीटर इतका जिल्ह्यात पाऊस झाला. दर वर्षी तो १४२ मिलिमीटर इतका असतो. ज्या तालुक्यांत जूनचा हा पाऊस झाला, तेथे जलयुक्तमधून झालेल्या कामांमुळे जुलै महिन्यातील पाणीटंचाईची झळ कमी झाल्याचे दिसून आले.
विहिरींचे उद्भव वाढल्याने पाण्यासाठीची भटकंती कमी झाली. तसेच, जानेवारीपासून जिल्ह्यात दर महिन्याला अवकाळी पाऊस पडत होता. तसेच जिल्ह्यात झालेल्या नळपाणी पुरवठा योजनांमुळे यंदा पाणीटंचाईची झळ कमी बसली, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
(प्रतिनिधी)
पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रमात असलेल्या तसेच ५० पेक्षा कमी पैसेवारी आलेल्या व टंचाईग्रस्त २०० गावांची निवड करून सुमारे २१९ कोटींचा आराखडा तयार केला होता. त्यांपैकी शासन निधी ३६ कोटी व लोकसहभागातून २२ कोटी, अशी ५८ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. ३१ जुलैपर्यंत पहिल्या टप्प्यात १४० गावे, तर राहिलेली ६० गावे ३१ डिसेंबर २०१५ व ३१ मार्च २०१६ पर्र्यंत दोन टप्प्यांत टंचाईमुक्त होतील, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.