स्किझोफ्रिनिया रुग्णांसाठी ‘हाफ वे होम’
By admin | Published: May 22, 2017 04:51 AM2017-05-22T04:51:22+5:302017-05-22T04:51:22+5:30
रुग्णालयात ७० टक्क्यांहून अधिक रुग्ण स्किझोफ्रिनियाग्रस्त आहेत. त्यांना औषधोपचारांबरोबरच समुपदेशन, मार्गदर्शन, पुनर्वसनावर भर दिला जातो.
रुग्णालयात ७० टक्क्यांहून अधिक रुग्ण स्किझोफ्रिनियाग्रस्त आहेत. त्यांना औषधोपचारांबरोबरच समुपदेशन, मार्गदर्शन, पुनर्वसनावर भर दिला जातो. रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्यावर थेट घरी पाठवण्याऐवजी ‘हाफ वे होम’साठी शासनातर्फे प्रयत्न सुरू आहेत. ‘हाफ वे होम’अंतर्गत रुग्णांचा आत्मविश्वास वाढवणे, समाजाशी जुळवून घेण्याची सवय लावणे, स्वतंत्र व्यक्तिमत्त्व विक सित करणे यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे रुग्णांना मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल, असे मत येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वरिष्ठ मनोविकासतज्ज्ञ डॉ. मधुमिता बहाले यांनी व्यक्त केले.
येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये सुमारे १६७० मनोरुग्ण आहेत. त्यापैकी ७० टक्क्यांहून अधिक स्किझोफ्रेनिक रुग्ण आहेत. स्किझोफ्रिनिया हा तीव्र स्वरूपाचा मानसिक आजार आहे. वेळेवर निदान होऊन योग्य औषधोपचार न मिळाल्यास हा दीर्घकालीन स्वरूपाचा आजार ठरू शकतो. तीव्रता
वाढल्यास रुग्णाची क्षमता दिवसेंदिवस कमी होत जाते, असे मत बहाले यांनी व्यक्त केले.
त्या म्हणाल्या, ‘‘रुग्णालयामध्ये बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांपैकी ६० टक्के, तर भरती झालेल्या रुग्णांपैकी ७० टक्क्यांहून अधिक रुग्ण स्किझोफ्रिनियाचे असतात. रुग्णालयामध्ये रुग्णांना औषधोपचारांबरोबरच समुपदेशन, आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढवण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम आयोजित केले जातात.
स्किझोफ्रेनियामध्ये रुग्ण सारासार विचार करणे, समाजामध्ये संतुलितरीत्या वागणे इत्यादी बाबतीत असलेली क्षमता गमावून बसतो. कुवत घालवून बसतो. चुकीची विचार करण्याची पद्धत, चुकीचे समज, पूर्वग्रहदूषित वागणे, नैराश्य, संशय आदींच्या गर्तेत अडकतो. अशा वेळी रुग्णांना समजून घेण्याची नितांत गरज असते. रुग्णाला बरे होण्याच्या प्रक्रियेत नातेवाईक, कुटुंबीय कशा प्रकारे मदत करू शकतात, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी रुग्णालयातर्फे कार्यशाळा, मेळावे आयोजित केले जातात. २४ मे रोजी स्किझोफ्रिनिया दिनानिमित्त रुग्ण आणि नातेवाईक यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. २५ मे रोजी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी रुग्णांची देखभाल कशी करावी, त्यांना कशा प्रकारे समजून घ्यावे, याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
रुग्णालयामध्ये औषधोपचारांबरोबरच विशेष लक्ष केंद्रित केले जाते. अँटिसायकोटिक औषधांबरोबरच विविध थेरपी, समुपदेशन आणि रुग्णाच्या पुनर्वसनावर मोठ्या प्रमाणावर भर दिला जातो. रुग्णाची बौद्धिक क्षमता, आकलनाच्या दृष्टीने तो रुग्णालयातून घरी जात असताना कुटुंबीयांना ‘सायको एज्युकेशन’ दिले जाते. रुग्णाला पुन्हा त्रास होऊ लागल्यास लक्षणे कशी ओळखायची, चिडचिड, हिंसक वृत्ती, एकलकोंडेपणा कसा टाळायचा याबाबत मार्गदर्शन केले जाते. रुग्ण बरे होण्याच्या प्रक्रियेमध्ये कुटुंबीयांची भूमिका खूप महत्त्वाची असते. रुग्णाची थट्टा न करता किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष न करता प्रेमाने वागणे, समजून घेणे आवश्यक आहे. याबाबत समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हायला हवी. बरेचदा रुग्णाच्या भावना समजून न घेता त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते.
अशाने रुग्ण अधिकच निराशेच्या गर्तेत फेकले जातात. कुटुंबीयांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून रुग्णाच्या भावनांना योग्य दिशा देणे आवश्यक असते.
स्किझोफ्रिनिया पूर्णपणे बरा होण्याचे प्रमाण १५-२० टक्क्यांच्या दरम्यान आहे. रुग्णालयात औषधोपचार घेत असताना सकारात्मक सुधारणा होत असलेल्या रुग्णांसाठी प्रायोगिका तत्त्वावर नवीन वॉर्ड सुरू करण्यात येत आहे. या वॉर्डमध्ये रुग्णांना किमान देखभाल आणि अधिक स्वातंत्र्य हे सूत्र अवलंबले जाणार आहे. या ठिकाणी आत्मविश्वास वाढण्याच्या दृष्टीने रुग्णांना गार्डनिंगसारख्या लहान-मोठ्या कामांचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. त्यामुळे त्यांना स्वयंरोजगाराचे धडे मिळू शकतील. जागतिक आरोग्य संघटनेने यंदाचे वर्ष ‘नैराश्य’ या विषयाला समर्पित केले असल्याने रुग्ण आणि नातेवाईक यांच्यासाठी विविध उपक्रम, ओरिएंटेशन प्रोग्रॅम राबवले जाणार आहेत. यातून रुग्णांशी जास्तीत जास्त संवाद साधून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतील.