जायकाचे निम्मे काम मार्चपर्यंत होणार पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 01:27 AM2018-10-16T01:27:16+5:302018-10-16T01:27:48+5:30

मुळा-मुठा नदी सुधारणा योजना : केंद्राकडून मिळणार १ हजार कोटी रूपयांचा निधी

Half of the work will be done till March by jaika | जायकाचे निम्मे काम मार्चपर्यंत होणार पूर्ण

जायकाचे निम्मे काम मार्चपर्यंत होणार पूर्ण

Next

पुणे : मुळा-मुठा नदी सुधारणेसाठी (जायका प्रकल्प) केंद्र शासनाकडून एक हजार कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असून त्यातील काही रक्कम पालिका प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा आढावा घेण्यात आला आहे. मात्र, येत्या मार्च महिन्यात जायका प्रकल्पाचे निम्म्याहून अधिक काम पूर्ण झालेले असेल, असा दावा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी केला. तसेच मेट्रो प्रकल्पाच्या जागेस संरक्षण मंत्रालयाकडून मान्यता मिळाली असून आगाखान पॅलेस येथील मेट्रोचा मार्ग बदलण्यात येणार आहे, असेही जावडेकर यांनी स्पष्ट केले.


जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) आढावा बैठक प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे घेण्यात आली. बैठकीस पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, खासदार अनिल शिरोळे, शिवाजीराव आढळराव पाटील, अमर साबळे, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, बाबूराव पाचर्णे, शरद सोनवणे, महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्र्रकांत सोनवणे आदी उपस्थित होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत जावडेकर यांनी जायका प्रकल्पाची माहिती सांगितली.


जावडेकर म्हणाले, केंद्र शासनाकडून राबविल्या जाणा-या योजनांच्या स्थितीचा आढावा घेता यावा; या उद्देशाने दिशा समितीची बैठक आयोजिली जात आहे. सोमवारी विधान भवन येथे जिल्ह्यातील विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. जायका प्रकल्पासाठी केंद्राकडून एक हजार कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. एक हजार कोटी रुपयांचे कर्ज पुणेकरांना फेडावे लागणार नाही; तर केंद्र शासन फेडणार आहे. नदी सुधारणेचे काम सध्या सुरू असून लवकरच या कामाचा शुभारंभाचा कार्यक्रम होईल.


शहरात सुरू असलेले मेट्रो प्रकल्प जलदगतीने सुरू असून अनेक ठिकाणांहून मेट्रो सुरू करण्यची मागणी होत आहे, असे नमूद करून जावडेकर म्हणाले, मेट्रोच्या रेंजहिल्स येथील संरक्षण मंत्रालयाकडे असलेल्या जागेस चार दिवसांपूर्वी मान्यता मिळाली. तसेच आगाखान पॅलेस येथील मेट्रोची पुनर्रचना केली जाणार असून त्याचा आढावा घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे लोहगाव विमानतळाकरून दरवर्षी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत २५ टक्क्यांनी वाढ होत आहे. त्यामुळे या विमानतळासाठी आवश्यक जागा देण्यात आली असून पायाभूत सुविधांमध्ये वाढ केली जात आहे. तसेच जिल्ह्यातील रस्त्यांची जलदगतीने कामे सुरू आहेत.

Web Title: Half of the work will be done till March by jaika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.