२१ व्या शतकात निम्मे तरुण नोकरीस अपात्र?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 04:36 AM2019-11-11T04:36:24+5:302019-11-11T04:36:31+5:30
२०३० मध्ये जवळपास निम्म्याहून अधिक दक्षिण आशियाई विद्यार्थी हे कौशल्याअभावी नोकरी मिळण्यास अपात्र ठरणार असल्याचा धक्कादायक अंदाज युनिसेफ संस्थेने वर्तवला आहे.
- नेहा सराफ
पुणे : २०३० मध्ये जवळपास निम्म्याहून अधिक दक्षिण आशियाई विद्यार्थी हे कौशल्याअभावी नोकरी मिळण्यास अपात्र ठरणार असल्याचा धक्कादायक अंदाज युनिसेफ संस्थेने वर्तवला आहे. युनिसेफच्या प्रमुख हेंद्रिटा फोर यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या अभ्यासात भारतासह बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, भूतान, मालदीव, श्रीलंका या देशांचा समावेश आहे.
दररोज दक्षिण आशियाई देशांमधून सुमारे १ लाख तरुण हे नोकरी वतुर्ळात आशेने प्रवेश करतात. आधीच जागतिक मंदीमुळे दक्षिण आशियातले देश कठीण कालखंडातून जात आहेत. सध्या या देशातले हजारो तरुण बेरोजगारीला तोंड देत आहेत. त्यातच भविष्यात देशातील विद्यार्थ्यांच्या कौशल्य अभावामुळे होणारे नुकसान मोठे असणार आहे. फोर यांच्या मते, कुशल तरुणांच्या कौशल्याचा परिणाम हा थेट त्या देशाचा आर्थिक विकासावर होतो. भारतात सध्या अशा तरुणांची संख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे भविष्यातही बेरोजगारीचा अधिक फटका बसू शकतो असा इशाराही यात देण्यात आलेला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी संस्थेच्या मते बेरोजगारीचा दर सध्या ८.४५ टक्के आहे. आॅटो, टेलिकॉम आणि आयटीसारख्या क्षेत्रात हा दर अधिक असल्याचे दिसत आहे.
>ठळक मुद्दे
कौशल्याअभावी भविष्यात लाखो विद्यार्थी नोकरीविना
भारताला बसणार सर्वाधिक फटका
बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान,
भूतान, मालदीव, श्रीलंकेलाही
भेडसावणार प्रश्न
>हे उपाय आवश्यक
सरकारकडून वेळोवेळी बाजारात नोकरीच्या संधी असणाऱ्या क्षेत्राचे परीक्षण
शिक्षण देताना लेखी शिक्षणासोबत प्रात्यक्षिकावर भर देण्याची गरज
करिअरचे पारंपरिक पर्याय न निवडता वेगळ्या संधींची निवड
>दक्षिण आशियातील देशांमध्ये कौशल्य
विकासासह शिक्षण घेण्याचे प्रमाण
देशाचे नाव २०१९ २०१३ (अंदाज)
बांगलादेश २६% ५५%
भूतान ४७% ८१%
भारत १९% ४७%
मालदीव १६% ४६%
नेपाळ १८% ४०%
पाकिस्तान १८% ४०%
श्रीलंका ६१% ६८%
>मुळात शिक्षणाच्या पद्धतींमध्ये बदल होण्याची गरज आहे. नुसते अभ्यासक्रम तयार करण्यापेक्षा मार्केटच्या गरजा बघून प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. याशिवाय मार्केटच्या गरजा कळण्यासाठी सरकारने किमान सहा महिन्यांनी सर्वेक्षण करावे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अभ्यासक्रम निवडताना समुपदेशन करणे योग्य ठरते.
- डॉ. स्वाती मुजुमदार,
प्र-कुलगुरू, सिम्बायोसिस
कौशल्य विद्यापीठ, पुणे
>पाठ्यपुस्तकात सांगितलेल्या अभ्यासाच्या पलीकडे आता प्रात्यक्षिकांवर भर देण्याची गरज आहे. तसे झाले नाही तर येणाºया काळात विद्यार्थी मागे पडू शकतात. कौशल्य विकास हा विषय प्रत्येक क्षेत्रात वेगळा असला तरी अत्यावश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याचा जरूर अभ्यास करावा आणि अनुभव घ्यावा, तरच आगामी काळातल्या बदलांना ते सामोरे जाऊ शकतील.
- डॉ. पूजा मोरे,
समन्वयक कौशल विकास केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ