अर्ध्या रस्त्यातून एसटी आणली परत; बारामतीत नऊ कर्मचारी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 07:25 PM2022-11-03T19:25:38+5:302022-11-03T19:25:52+5:30
बस रस्त्यातून परत आणल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्याची ही अलीकडील काळात पहिलीच वेळ
बारामती : एसटी बस ठरलेल्या मार्गावर अर्ध्या रस्त्यातून परत आणणे आगाराच्या चालक वाहकांना महागात पडले आहे. प्रवाशांची गैरसोय केल्याच्या महिला प्रवाशांच्या तक्रारीवरुन राज्य परिवहन महामंडळाच्या आगारातील चार चालक, चार वाहक व नियंत्रक अशा नऊ जणांना येथील प्रभारी आगार व्यवस्थापक मनीषा इनामके यांनी काल निलंबित केले आहे. बस रस्त्यातून परत आणल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्याची ही अलीकडील काळात पहिलीच वेळ आहे.
एक नोव्हेंबर रोजी बारामती ते नीरा या ठिकाणी जाणारी एसटी बस वडगाव निंबाळकर या बस स्थानकातूनच परत आणल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. एसटी बस ठरलेल्या मार्गावर बस न नेता ती अर्ध्या रस्त्यातून परत आणल्याची तक्रार काही प्रवाशांनी केली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या झालेल्या गैरसोयीला जबाबदार धरून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी काही प्रवाशी महिलांनी पुणे विभागाचे नियंत्रक रमाकांत गायकवाड यांच्याकडे मोबाईल वरून तक्रार दाखल केली होती. चार वाहक व चार चालकांनी बारामती मधून निघाल्यानंतर वडगाव निंबाळकर येथूनच या चार बसेस माघारी फिरवल्या आहेत. त्यामुळे वडगाव निंबाळकर येथून नीरा बाजूकडे जाणाºया प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याची तक्रार करण्यात आली.
याबाबतच्या तक्रारी थेट रमाकांत गायकवाड यांच्याकडे गेल्या. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळल्याने निलंबनाची कारवाई केली. अशा प्रकारे एसटीची पूर्ण फेरी न करता कोणालाही कल्पना न देता किंवा परवानगी न घेता अर्ध्या रस्त्यातून बस परत आणण्याचा प्रकार शिस्तभंग आहे. शिस्तभंगाचा कोणताही प्रकार खपवून घेतला जाणार नाही. त्यामुळे याची दखल घेत निलंबनाची कारवाई केल्याचे रमाकांत गायकवाड यांनी सांगितले.