पुणे मालधक्का रेल्वे प्रशासनाने अचानक बंद केल्याच्या निषेधार्थ हमाल, हुंडेकरी काढणार मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:38 PM2017-12-21T12:38:15+5:302017-12-21T12:44:36+5:30
पुणे मालधक्का रेल्वे प्रशासनाने अचानक बंद केल्याच्या निषेधार्थ हमाल आणि हुंडेकरी शुक्रवारी मोर्चा काढणार आहेत. याबाबत त्वरित निर्णय घेतला नाही, तर बाजार बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे : पुणे मालधक्का रेल्वे प्रशासनाने अचानक बंद केल्याच्या निषेधार्थ हमाल आणि हुंडेकरी शुक्रवारी मोर्चा काढणार आहेत. याबाबत त्वरित निर्णय घेतला नाही, तर बाजार बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रशासनाने बंद करताना कसलीही पूर्वसूचना न देता, मालधक्क्यात मालगाड्या आणणे बंद केले. त्यामुळे शेकडो हमालांचा रोजगार बंद झाला. हुंडेकऱ्यांचा व्यापार ठप्प झाला आहे. यामुळे हवालदिल झालेल्या हमाल व हुंडेकऱ्यांचे ११ डिसेंबरपासून विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. हमाल पंचायत, ट्रान्सपोर्ट व डॉक वर्कर्स युनियन, हुंडेकरी असोसिएशन या संघटनांच्या वतीने सुरू असणाऱ्या आंदोलनाचा आज आठवा दिवस होता.
या कालावधीत रेल्वे प्रशासनाकडून कसलाही प्रतिसाद न मिळाल्याने बाजार बंद ठेवून रेल्वे व्यवस्थापकांच्या कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्याचा इशारा आंदोलकांनी १३ डिसेंबरला त्यांची कसलीही दखल न घेतली गेल्याने, शुक्रवारी बाजार बंद ठेवून विभागीय रेल्वे कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मालधक्का येथून निघणारा हा मोर्चा आधी जिल्हाधिकारी कचेरीवर जाईल.