पुणे मार्केटयार्डात दिला 'हमाल ऑफ द इअर' पुरस्कार; 3 हजार कामगारापैकी निवडले सर्वोत्कृष्ट 3 हमाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 06:19 PM2022-09-19T18:19:17+5:302022-09-19T18:23:18+5:30
हा पुरस्कार या हमालांना कसा मिळाला ते जाणून घ्या...
किरण शिंदे/प्रतिनिधी पुणे : आजवर आपण स्टुडन्ट ऑफ द इयर, एम्प्लॉयी ऑफ द इयर या नावाने पुरस्कार दिल्याचे ऐकले असेल. परंतु 'हमाल ऑफ द इयर' असा पुरस्कार दिल्याचं ऐकलं आहे का? नक्कीच ऐकलं नसणार. परंतु असा पुरस्कार देण्यात आला आहे. पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करणाऱ्या तीन हमालांना हा पुरस्कार देण्यात आला. तर हा पुरस्कार या हमालांना कसा मिळाला त्याची माहिती जाणून घेऊया.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत अंदाजे दोन ते तीन हजार ट्रक दररोज शेतमाल घेऊन येत असतात. हा शेतमाल उतरवण्यासाठी जवळपास तीन हजार माथाडी कामगार याठिकाणी काम करतात. कामगारांचं हे काम कष्टाचं, ओझ्याचं आणि अनिश्चिततेचं आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या तीन कामगारांची सर्वोत्कृष्ट हमाल म्हणून निवड करण्यात आली. मार्केटयार्डातील छत्रपती शिवाजी गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी ज्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचा लौकिक वाढवण्याचं काम केलं अशांना पुरस्कार दिले जातात.
यावर्षीचा हा पुरस्कार रवींद्र सोनवणे, शशिकांत शिंदे आणि प्रशांत काची या तीन हमालांना देण्यात आला. पुरस्कार मिळाल्यानंतर या हमालांनी लोकमतशी बोलताना त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
कसे निवडले विजेते-
ज्यांनी आतापर्यंत चांगले काम केले. ज्या हमालांनी त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण दिले, कोणताही नशा केला नाही, समाजात चांगले योगदान ज्या हमालांनी दिले, अशा कामगारांना पुरस्कार देिले गेले.
हमालांचं काम तसं सोपं नसतं. हलाखीच्या परिस्थितीत आणि तुटपुंज्या पैशात हे काम करावं लागतं. त्यात लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोनही वेगळा असतो. दुसरा पर्याय नसल्याने हे काम करणं त्यांना भाग आहे. परंतु अशा परिस्थितीतही कोणी आपल्या कामाची दखल घेतं आणि पुरस्कार देऊन कौतुक करतं तेव्हा आनंद गगनात मावेनासा होतो, अशी भावना या पुरस्कार विजेत्या हमालांनी व्यक्त केली.