लघुपटातून उलगडणार हमीद दलवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 04:01 AM2018-06-15T04:01:41+5:302018-06-15T04:01:41+5:30
मुस्लिम समाजाच्या उत्थानासाठी लढा उभारणारे, संघटनेच्या माध्यमातून समानतेचे, सामाजिक सुधारणेचे, धर्मनिरपेक्षतेचे बीज पेरणारे हमीद दलवाई सर्वांनाच परिचित आहेत. मात्र, त्यांच्यातील चिंतनशील लेखक, संवेदनशील माणूस असे विविधांगी पैलू तरुण पिढीला फारसे माहीत नाहीत.
पुणे - मुस्लिम समाजाच्या उत्थानासाठी लढा उभारणारे, संघटनेच्या माध्यमातून समानतेचे, सामाजिक सुधारणेचे, धर्मनिरपेक्षतेचे बीज पेरणारे हमीद दलवाई सर्वांनाच परिचित आहेत. मात्र, त्यांच्यातील चिंतनशील लेखक, संवेदनशील माणूस असे विविधांगी पैलू तरुण पिढीला फारसे माहीत नाहीत. सामाजिक कार्यकर्त्या हमीदभार्इंमधील ‘आपला माणूस’ लघुपटातून सर्वांसमोर उलगडणार आहे. ‘हमीद : द अनसंग ह्यूमॅनिस्ट’ या लघुपटाची निर्मिती ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी केली आहे. ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा, हमीद दाभोलकर, अमृता सुभाष यांच्या संभाषणातून हमीदभार्इंचे विविध पैलू उलगडणार आहेत. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या मुलाखतीचा लघुपटात समावेश आहे.
हमीद दलवाईंनी आपल्या लेखनातून वास्तव चित्रण केले. त्यांचे उत्कट लेखन अनुभवातून आलेले होते. हेच चैतन्यशील व्यक्तिमत्त्व ‘हमीद : द अनसंग ह्यूमॅनिस्ट’ या लघुपटातून जाणून घेता येणार आहे.
हमीदभार्इंचा सहवास लाभलेल्या दिग्गजांच्या मुलाखती यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. कोकणातील मिरजोळी (ता. चिपळूण) या हमीद दलवाई यांच्या जन्मगावापासून या लघुपटाला प्रारंभ होतो. हमीद दलवाई यांचा व्यक्ती, लेखक, कार्यकर्ता आणि समाजसुधारक अशा वेगवेगळ्या पैलूंवर लोकांच्या छोटेखानी मुलाखतींतून प्रकाश टाकण्यात आला आहे. नसिर यांच्यासह अमृता सुभाष आणि क्षितीश यांनी निवेदकाची भूमिका साकारली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सय्यदभाई, डॉ. कुमार सप्तर्षी यांच्यासह दलवाई यांचे बंधू खासदार हुसेन दलवाई यांनी हमीद दलवाई यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले आहेत, अशी माहिती ज्योती सुभाष यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
नव्या पिढीला परिचय व्हावा
दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे हमीद दलवाई यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तो मेहरुन्निसा दलवाई यांनी स्वीकारला होता. या क्षणाचे चित्रीकरण या लघुपटात समाविष्ट करण्यात आले आहे,
ज्योती सुभाष म्हणाल्या, या कार्यक्रमाने मी भारावून गेले. त्या भारावलेपणातच हमीदभाई यांचे साहित्य पुन्हा एकदा वाचून काढले. या अलौकिक व्यक्तिमत्त्वाचा नव्या पिढीला परिचय व्हावा या उद्देशातूनच लघुपटाची निर्मिती केली आहे.
खरतर या विषयावर मला चित्रपटच करायचा होता आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालयातील माझा सहाध्यायी नसिरुद्दीन याने हमीद दलवाई यांची भूमिका करावी, अशी इच्छा होती. निर्मितीचा माझा हा पहिलाच
प्रयत्न असल्याने ६४ मिनिटे कालावधीचा लघुपट करण्याचे ठरविले.
ओंकार अच्युत बर्वे यांनी दिग्दर्शन साहाय्य केले आहे. नसिरुद्दीन शहा यांच्यासह प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष, डॉ. हमीद दाभोलकर आणि क्षितिश दाते यांनी या लघुपटासाठी निवेदक म्हणून काम केले आहे.
योगेश राजगुरू यांनी छायालेखनाचे, क्षमा पाडळकर यांनी संकलनाचे, विपुल पॉल यांनी ध्वनिसंयोजनाचे काम केले असून, लघुपटाला नरेंद्र भिडे यांचे पार्श्वसंगीत आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे प्रेक्षागृह येथे रविवारी (१७ जून) संध्याकाळी साडेसहा वाजता या लघुपटाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.