अण्णापूरमध्ये ५६ घरांवर हातोडा
By admin | Published: October 27, 2016 05:04 AM2016-10-27T05:04:20+5:302016-10-27T05:04:20+5:30
शिरूर तालुक्याचे लक्ष लागलेल्या अण्णापूर (ता. शिरूर) येथील गायरान जमिनीवरील ५६ घरांचे अतिक्रमण प्रशासनाने आज काढले. या धडक कारवाईमुळे तालुक्यातील
टाकळी हाजी : शिरूर तालुक्याचे लक्ष लागलेल्या अण्णापूर (ता. शिरूर) येथील गायरान जमिनीवरील ५६ घरांचे अतिक्रमण प्रशासनाने आज काढले. या धडक कारवाईमुळे तालुक्यातील अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत.
शिरूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये गायरान जमिनी, तसेच गावठाण हद्दी अतिक्रमणाने वेढलेल्या आहेत. त्यांच्यावर राजकीय पुढाऱ्यांचाच वरदहस्त असल्यामुळे काही ठिकाणी पक्की घरे, व्यापारी गाळे आणि बंगलेही उभे राहिले आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही ही अतिक्रमणे वर्षानुवर्षे तशीच आहेत. त्यामुळे गावच्या विकासाच्या नवीन योजना राबविताना जागेसाठी ग्रामपंचायतीसमोरच समस्या उभी राहत आहे.
अण्णापूर (ता. शिरूर) येथे गट नं. ३०५२ मध्ये शिरूर-भीमाशंकर रस्त्याच्या शेजारी महत्त्वाच्या जागेवर ५६ लोकांनी घर, गोठा अशा पद्धतीने अतिक्रमण केले होते. ग्रामपंचायतीने या लोकांना नोटिसा दिल्या होत्या. मात्र काही लोकांनी आयुक्तांकडून स्थगिती मिळविली होती.
याबाबत गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ म्हणाले, की सन २०११ला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला आहे. त्यांच्यानुसार तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ, सहायक गटविकास अधिकारी ए. व्ही. बांगर यांच्यासह पोलीस निरीक्षक दयानंद गावडे त्यांच्या पोलीस बंदोबस्तासह हे अतिक्रमण काढण्यात आले.
पश्चिम भागातील पिंपरखेड, टाकळीहाजी, वडनेर, जांबुत, मलठणमध्येदेखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. तसेच पूर्व भागातील मांडवगण फराटा, इनामगाव सादलगाव यांसारख्या अनेक गावांत अतिक्रमणे आहेत. बसस्थानक व मोक्याच्या जागांवरील अतिक्रमणे काढल्यास मुलासाठी खेळाची मैदाने, शाळा, दवाखाना यांसारख्या सार्वजनिक उपक्रमांसाठी जागा उपलब्ध होऊ शकते. (वार्ताहर)