पुणे | ज्युस सेंटरच्या मालकाच्या डोक्यात घातला हातोडा; शिवाजी पुलाखालील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 05:05 PM2022-04-28T17:05:18+5:302022-04-28T17:25:37+5:30
हल्लेखोराने इतक्या रागाने हा वार केला की त्यात त्यांच्या डोक्याच्या कवटीला गंभीर जखम...
पुणे : शिवाजी पुलाखाली असलेल्या स्वामी समर्थ ज्युस सेंटरच्या मालकाच्या डोक्यात हातोड्याने वार करुन त्यांच्या खूनाचा प्रयत्न करण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री घडला. यामध्ये ज्युस सेंटरचे मालक हे गंभीर जखमी झाले असून हल्लेखोराने इतक्या रागाने हा वार केला की त्यात त्यांच्या डोक्याच्या कवटीला गंभीर जखम झाली आहे.
हेमंत राजेंद्र कणसे (रा. चौधरी वस्ती, खराडी) असे स्वामी समर्थ ज्युस सेंटरच्या मालकाचे नाव आहे. ही घटना शिवाजी पुलाच्या खालील ममता हॉटेलच्या बाजूला स्वामी समर्थ ज्युस सेंटरच्या समोर बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दीपक प्रल्हाद सोळंके (वय २३, रा. कसबा पेठ) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी हे हेमंत कणसे यांच्या स्वामी समर्थ ज्युस सेंटरवर काम करतात. बुधवारी रात्री ते व कणसे ज्युस सेंटरवर असताना एक जण आला. त्याने लोखंडी हातोड्याने हेमंत कणसे यांच्या डोक्यात, कानाजवळ, डोक्याच्या पाठीमागे एका मागोमाग एक असे तीन वार केले. त्यामुळे कणसे जखमी होऊन खाली पडले. त्यांना वाचविण्यासाठी दीपक धावले असताना हल्लेखोराने त्यांच्याही डाव्या हाताच्या दंडावर हातोड्याने मारुन जखमी केले. त्यानंतर हल्लेखोर मोटारसायकलवरुन शिवाजीनगरच्या दिशेने पळून गेला.
हल्लेखोराने अंगात काळसर रंगाचा र्शट, आकाशी रंगाची जिन्स पॅंट व पांढरे बूट घातले होते. त्याने तोंडाला पांढरा रुमाल बांधला होता. तसेच त्याने रात्र असतानाही निळ्या रंगाची टोपी घातली होती. त्यामुळे त्याची ओळख पटू शकली नाही. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. वैयक्तिक कारणावरुन हा हल्ला झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मोटारसायकलचा माग काढून हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे. सहायक पोलीस निरीक्षक बी. एच. अहिवळे अधिक तपास करीत आहेत.