वानवडीत बेकायदा खोदाई कामावर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:10 AM2021-05-23T04:10:36+5:302021-05-23T04:10:36+5:30
पथविभागाकडून व्हीटीपीएल या खाजगी कंपनीला वानवडीत तीनशे मीटर रस्ते खोदाईकरुन केबल टाकण्याच्या कामाला परवानगी देण्यात आली होती. परंतु कंपनीने ...
पथविभागाकडून व्हीटीपीएल या खाजगी कंपनीला वानवडीत तीनशे मीटर रस्ते खोदाईकरुन केबल टाकण्याच्या कामाला परवानगी देण्यात आली होती. परंतु कंपनीने वानवडी परिसरात जवळपास एकूण नऊशे मीटर खोदाई केली. त्यामधील सहाशे मीटर खोदाई ही अनधिकृत पद्धतीने केली असल्याचे पथविभागाकडुन सांगण्यात आले.
माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश सामल यांनी या कामाबाबत पथविभागाकडे विचारणा केल्यानंतर वानवडीतील अनाधिकृत खोदकामाबद्दल पितळ उघडे पडले. खोदकामासंदर्भात कोणतीही परवानगी अथवा चलन भरलेले नाही तसेच अधिकृत कामाच्या आदेशाचे पत्र देखील नाही. त्यामुळे अनधिकृत काम करणाऱ्या खाजगी कंपनीवर व संबंधित व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी असे दिनेश सामल यांनी सांगितले.
शनिवारी सकाळी पथविभागाच्या कनिष्ठ अभियंता गौरी नंदे यांनी प्रत्यक्ष खोदाई केलेल्या ठिकाणी पाहणी केली. यावेळी खोदललेल्या भागाची मोजणी केली असता जवळपास सहाशे मीटर जास्त खोदाई झाल्याचे उघड झाले व जास्तीची खोदाई करुन टाकण्यात आलेले केबलचे पाईप काढण्यास सुरुवात करत संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे सांगितले.
रस्त्यांवरील खोदकाम कोण करत आहे याबाबत काहीही घेणे देणे नसणाऱ्या सामान्य नागरिकांना खोदकामानंतर पडलेल्या राडारोड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पावसाळा सुरु होण्याअगोदर राडारोडा लवकरात लवकर साफ होईल अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.
गौरी नंदे, कनिष्ठ अभियंता, पथविभाग वानवडी
व्हीटीपीएल कंपनीला वानवडीत तीनशे मीटर पर्यंत खोदकाम करुन केबल टाकण्याची परवानगी दिली होती. त्यांचेच हे काम असण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात पहाणीमध्ये जवळपास सहाशे मीटर खोदाई ही विनापरवाना झाल्याचे दिसून आले. अनधिकृत खोदाई केलेल्या भागातील पाईप काढून टाकण्याचे काम सुरु असून संबधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
फोटो : पथविभाग अधिकारी गौरी नंदे यांच्या उपस्थितीत केबल पाईप काढतेवेळी कर्मचारी.