अनधिकृत बांधकामांवर हातोडा
By admin | Published: April 2, 2015 05:48 AM2015-04-02T05:48:42+5:302015-04-02T05:48:42+5:30
न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत बांधकामांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने बुधवारपासून कारवाई सुरू केली आहे.
पिंपरी : न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत बांधकामांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने बुधवारपासून कारवाई सुरू केली आहे. दिवसभरात पाच बांधकामांवर हातोडा टाकून चार हजार सहाशे सहासष्ट स्क्वेअर फुटांची बांधकामे भूईसपाट केली. तसेच औद्योगिक परिसरातील सात शेड हटविली.
पिंपरी-चिंचवड शहरातील ६६ हजारांहून अधिक अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. एक एप्रिलपासून कारवाई सुरू करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले होते.त्यानुसार कारवाई सुरु झाली.
महापालिकेने जाहीर केल्यानुसार आज सकाळी दहापासून कारवाई सुरुवात झाली. कारवाईस विरोध होऊ शकतो. ही शक्यता गृहीत धरून महापालिका प्रशासनाने कारवाईबाबत कमालीची गुप्तता बाळगली होती. त्यामुळे कोणत्या भागात कारवाई होणार, याबाबतची माहिती मुख्य अधिकारी वगळता कोणालाही नव्हती. महापालिकेने प्रभागनिहाय कारवाईचे नियोजन केले होते. कडकोट बंदोबस्तात कारवाईला सुरुवात झाली. अ प्रभागातील चिंचवडमधील वाल्हेकरवाडी स्वामी विवेकानंद सोसायटीत अनधिकृत बांधकामावर कारवाई करणारे पथक दाखल झाले. त्यांनी एका सर्वे नं. ८३ मधील पत्र्यांच्या घरातील नागरिकांना आपले साहित्य बाहेर काढण्यास सांगितले. अचानकपणे आलेल्या पथकामुळे येथील नागरिकांची पुरती धांदल उडाली. महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी घरातील साहित्य बाहेर काढले. त्यानंतर नऊशे स्क्वेअर फुटांचे घर पाडण्यात आले. या वेळी स्वत:च्या डोळ्यांसमोर घर पडताना पाहून येथील मायलेकाला अश्रू अनावर झाले. या कारवाईत तीन जेसीबी, १० कर्मचारी आणि २० पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. सोसायटीत कारवाई सुरू झाल्याची माहिती परिसरात पोहोचताच कामानिमित्त घराबाहेर पडलेले नागरिक घरी परतले. दुपारनंतर पथक दुसरीकडे रवाना झाले.
त्यानंतर ब प्रभागातील थेरगावमधील १२११ स्क्वेअर फुटांच्या बांधकामावर कारवाई केली. क प्रभागातील भोसरीतील फुलेनगर जवळच्या एमआयडीसीतील सेटमॅक मॅस्टॉनिक, वेलमेड लॉकींग सिस्टीम, हेमांग आॅटो पार्ट, सागा पॉलिटेक, नीता इंजिनियर्स, जैन फार्मा इंटरनॅशनल या शॉपवर कारवाई केली. ई प्रभागाकडून चऱ्होलीमध्ये सुमारे ८८५ स्क्वेअर फुटांच्या दोन बांधकामे भूईसपाट केली. फ प्रभागात रुपीनगर, संभाजीनगर येथे सुमारे १६५० स्क्वेअर फुटांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली.(प्रतिनिधी)